महावितरणचे अभियंता चेचर यांचा कर्तव्य तत्परतेबद्दल काँग्रेसकडून सत्कार

महावितरणचे अभियंता चेचर यांचा कर्तव्य तत्परतेबद्दल काँग्रेसकडून सत्कार
नेवासा फाट्यावरील खंडीत वीज पुरवठा स्वतः दखल घेत केला सुरळीत
नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या आठ दिवसांपासून नेवासा फाटा परिसरातील काही भागांमध्ये अनियमित बनलेला वीज पुरवठा महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी स्वतः दुरुस्त करून सुरळीत केल्याने जिल्हा काँग्रेस समिती अनुसूचित जाती विभाग आणि नेवासा तालुका काँग्रेस समितीच्यावतीने अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, शहराध्यक्ष रंजन जाधव यांच्या हस्ते नुकताच सत्कार करुन गौरव करण्यात आला.

गेल्या आठ दिवसांपासून नेवासा फाट्यावरील परिसरात सुरळीत वीज पुरवठ्यात मोठा व्यत्यय येत होता. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याबरोबरच विजेचा दाब सातत्याने कमी-जास्त होण्याचा प्रकार वाढल्याने घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहक वैतागले होते. संबंधित कर्मचार्‍यास लोकांनी वारंवार याबाबत सूचित करूनही हा प्रकार थांबण्याऐवजी वाढतच चालल्याने ऐन सणासुदीच्या काळात वेगळेच संकट मानगुटीवर बसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली.

याबाबत महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता शरद चेचर यांच्याशी संपर्क साधला असता रात्री आठ वाजता चेचर यांनी या बिघाड झालेल्या परिसरात येऊन ज्याठिकाणी वीज रोहित्र आहे, त्याठिकाणी पाहणी करून तसेच स्वतः रोहित्राची तपासणी करून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच तक्रार असणार्‍या ग्राहकांच्या घरी जाऊन पुरवठा तपासत सुरळीत केला. या तत्पर कार्याबद्दल कर्तव्यदक्ष उप-कार्यकारी अभियंता शरद चेचर यांचा काँग्रेस समितीच्यावतीने सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *