… मग अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय? ः दहातोंडे

… मग अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय? ः दहातोंडे
नुकसानग्रस्त भागात नेत्यांचे दौरे मात्र जिल्ह्याकडे दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, नगर
‘दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी मंत्री आणि नेते त्या भागात गेले पण अहमदनगरला पालकमंत्रीही फिरकले नाहीत. मग जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय?’ असा सवाल शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागात सध्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांचे दौरे सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याकडे लक्ष वेधताना दहातोंडे यांनी म्हटले आहे की, ‘अतिवृष्टीने लाखो शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले आहे. आधी दुष्काळाने छळले, यंदा ओल्या दुष्काळाने मारले आहे. असे असताना वेगाने पंचनामे होत नाहीत. अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का? येथील शेतकर्‍यांचे अश्रू सरकारमधील लोक, पालकमंत्री कधी पुसणार? सर्वच शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी.’

अहमदनगर जिल्ह्याबद्दल त्यांनी म्हटले आहे, ‘जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून सातत पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपातील बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमूग यांसह फळपिके आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात शेवगाव, पाथर्डी, कर्जतसह दक्षिण जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक भागात अतिवृष्टी म्हणजेच 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याचे सांगत पंचनामे केले जात नसल्याचे आढळून आले. राज्यातील विविध भागांमध्ये राजकीय नेते पदाधिकारी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. असे असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र राजकीय नेत्यांकडून दुर्लक्ष होत आहे. पालकमंत्री अजूनही कोणत्याही शेतकर्‍यांच्या दारात नाहीत. जिल्हा प्रशासन तसेच शासनाने तातडीने झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शेतकर्‍यांना मदत द्यावी, अन्यथ, शेतकरी मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल,’ अशा इशाराही दहतोंडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *