कोपरगाव नगरपालिकेचे पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष

कोपरगाव नगरपालिकेचे पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष
शहरवासियांमध्ये कमालीची नाराजी; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अक्षय काळे, कोपरगाव
एरव्ही राजकीय दृष्टीकोनातून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याच्या बातम्या माध्यमांद्वारे झळकतात. परंतु, आता पालिका पदाधिकारी आणि अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने कारभारावरील संपूर्ण नियंत्रण ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट फटका शहरातील पायाभूत सुविधांवर होत आहे. पालिकेला लाखोंचा कर भरुनही आवश्यक मुलभूत सुविधा मिळत नसल्याने शहरवासियांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून, वेळीच दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


कोपरगाव पालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तर विद्यमान अपक्ष नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना जनतेने विक्रमी मतांनी निवडून दिले आहे. सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार असले तरी पालिकेत भाजप-शिवसेना युती आहे. यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवकांतच एकमत नसल्याचा गैरफायदा कर्मचारी उचलत आहे. यातील 70 टक्के कर्मचारी हे बाहेर गावचे व दर तीन वर्ष मुदतीचे असल्याने त्यांना शहर विकासात कोणतेच देणेघेणे नाही. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. यात भर म्हणजे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मौनधारी बनल्याने जनता त्रासली आहे. तर नगरसेवक मूक गिळून बसले गप्प आहे. कोपरगाव शहरात कोट्यावधी रुपयांच्या दरवर्षी पाणी पुरवठ्याच्या योजना कागदोपत्री राबविल्या जात आहे. कारण शहरातील कोणलाही प्रभाग उपनगर, गावठाण गल्लीबोळात चक्कर मारली तर पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दृश्य दिसते.


बंद भूमिगत गटार योजनेत पावसाचे व नागरिकांनी वापरलेले पाणी बंद गटारीत सोडण्याची कोणती सुविधा नसल्यामुळे ज्या प्रभागात ज्या वेळेस पिण्याचे पाणी दिले जाते, त्यावेळेस सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. जागोजागी रस्त्यांना खड्डे पडल्याने त्या भागातील 30 टक्के नळ हे नादुरुस्त असल्याने पाण्याचे तळे साचते. यामुळे शहरात सर्वत्र डास, डुकरांनी उच्छाद मांडला आहे. नागरिकांनी वापरात नसलेले शहरातील किमान 400 ते 500 नळजोडण्या तुटल्यामुळे वाया जाणारे पाणी बंद करण्याचे अनेक अर्ज दिले. समक्ष चकरा मारुनही काम होत नाही. त्यामुळे 47.50 कोटीची विस्तारित पाणी पुरवठा योजना फसल्याने केंद्र शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकल्पाच्या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फेत ऑडिट व्हावे अशी जनतेची मागणी सत्तारुढ मुख्याधिकारी नगराध्यक्ष, नगरसेवक व वरीष्ठ अधिकार्‍यांनी धुडकावून लावली आहे.


छत्रपती संभाजी राजे पुतळ्यालगत, डॉ.बुब हाँस्पिटल समोरील धारणगाव रस्त्याची दुरवस्था कायम पाचवीला पुजली आहे. येथे गतिरोधक नसल्याने कायमच अपघात घडतात. तर समोरासमोरील वाहने धडकल्यामुळे भांडणे होतात. हीच अवस्था गुरुद्वारा रस्ता येथे कायम आहे. याच परिसरात मोठे रुग्णालये, बँका, पतपेढ्या, भाजीपाला व फळ बाजार आहे. येथील कचरा थेट रस्त्यावर फेकला जातो. त्यामुळे डुकरे, गाढव, गायी ठाण मांडून बसतात. कित्येकदा रस्त्यावर अस्ताव्यस्त फिरतात, झुंज करतात यातून अनेक अपघात घडत आहे. त्यांच्या दहशतीमुळे रस्त्यावर चालणेही मुश्कील आहे. या प्रकारामुळे नागरिकांत कायम वादावादी घडत आहे. यासाठी तातडीने हे दोन्ही रस्ते एकतर्फी वाहतुकीचे करावे. तसेच मुख्य रस्ता, बँक रस्ता, गुरुद्वारा रस्ता हे सम-विषम तारखेस आलटून-पालटून रस्त्याच्या एका कडेस उभी करण्याची सक्ती करावी. विशेषतः रस्त्यावरील विविध अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी शहरवासियांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *