महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करा ः मुरकुटे
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करा ः मुरकुटे
नेवासा येथे भाजपचे आक्रोश आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, नेवासा
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात भाजप महिला आघाडीच्यावतीने नेवासा येथे सोमवारी (ता.12) तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देऊन आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बाळासाहेब मुरकुटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चाललेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारीसारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर, रुग्णालयामध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला आहे हे सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचार घटनांना गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
यावेळी सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या आक्रोश आंदोलन प्रसंगी भाजपचे उत्तर जिल्हा सचिव दिलीप नगरे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे, सतीश गायके, महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.