‘फेसबुक’ मित्राकडून विधवेवर अडीच वर्ष अत्याचार समाज माध्यमांचा अतिरेकी वापर; पीडितेकडून तीस लाखांची रक्कमही उकळली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाज माध्यमातील ‘फेसबुक’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओळख होवून त्याचे रुपांतर प्रेमात, लग्नाचे आमिष दाखविण्यात आणि नंतर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्रकार संगमनेरच्या गावठाणातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अत्याचार करणार्‍या इसमाने पीडितेच्या एकटेपणाचा पुरेपूर फायदा घेत तिला व तिच्या मुलांना सांभाळण्याचे आश्वासन दिले व दरम्यानच्या काळात भूलथापा मारुन तिच्याकडून 30 लाखांहून अधिक रक्कमही उकळली. याप्रकरणी बाजारपेठेलगतच्या एका गल्लीत राहणार्‍या 38 वर्षीय विधवा तरुणीच्या फिर्यादीवरुन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील योगेश सुभाष टोपेकर या आरोपीविरोधात अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी त्याच्या मूळगावातून पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार कोविड संक्रमणाच्या काळात 2020 पासून सुरु होवून तो आजतागायत कायम होता. शहरातील बाजारपेठेच्या लगत असलेल्या एका गल्लीत पीडित महिला आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाल्याने तेव्हापासून ती एकटीच राहते. कोविडच्या काळात जनजीवन ठप्प असल्याने अनेकांना समाज माध्यमांचा लळा लागला आणि त्यातून नको ते प्रकार समोर यायला सुरुवात झाली. त्यातीलच ही एक घटना आहे. संक्रमणाच्या काळात पीडित 38 वर्षीय विधवा तरुणीची फेसबुकवरील ‘साईवास्तू परिवार’ नावाच्या पेजवर आरोपीशी ओळख झाली. सदरचे पेज आळंदी येथील योगेश सुभाष टोपेकर नावाचा इसम चालवितो. त्याच पेजवरील त्याची ‘दान उपाय’ या अध्यात्माशी निगडीत विषयाची जाहिरात पाहून पीडितेने त्याविषयी जाणून घेण्यासाठी नमूद मोबाईल क्रमांकावर फोन केला. तेव्हापासून त्या दोघांमध्ये संलग्न विषयाला अनुसरुन नेहमी बोलणे होवू लागले व त्यातून त्यांच्यात मैत्रीही निर्माण झाली.

पीडितेचा विश्वास संपादन करताना आरोपीने तिच्या घरातील अन्य लोकांविषयी माहिती घेतली. त्यातून सदरील महिला आपल्या दोन मुलांसह एकटीच रहात असल्याचे त्याला समजताच सप्टेंबर 2020 मध्ये तो आळंदीहून संगमनेरला आला आणि थेट ‘त्या’ महिलेच्या घरी गेला. चहा-पान आदी सोपस्कार उरकल्यानंतर बोलताबोलता पीडितेची दोन्ही मुले आजोळी गेल्याचे आरोपीला समजताच त्याने आपला कावा साधीत त्या असहाय तरुणीचा हात धरुन जबरदस्तीने तिला आतल्या खोलीत नेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडितेने ‘तुम्ही असे का केले? मी तुमची पोलिसांत तक्रार करते..’ असे सांगताच त्याने ‘मी तुझ्याशी लग्न करील, तुला व तुझ्या दोन्ही मुलांनाही सुखात ठेवेल’ असे आमिष दाखवले. त्यातून आपल्या जीवनाला आधार मिळेल या आशेने पीडितेने तक्रार देण्याचे टाळले, तेथेच आरोपीची योजना सफल झाली.

त्यानंतर आरोपीच्या नियमित संगमनेर वार्‍या सुरु झाल्या आणि प्रत्येकवेळी त्याने लग्नाचे आश्वासन देवून आपली शारीरिक भूक शमविली. या दरम्यान दोन-तीनवेळा त्याने पीडितेला साईबाबांच्या शिर्डीतही बोलावले आणि तेथेही वेगवेगळ्या लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केले. त्यावेळीही पीडितेने लग्नाचा विषय छेडला असता ‘मी नोकरी सोडली आहे, दुसरी नोकरी लागताच लग्न करु’ असे सांगत त्याने वेळ मारुन नेली. त्यानंतर 27 डिसेंबर 2020 रोजी आरोपीने पीडितेला फोन करुन त्याचे वडील जालना येथे मयत झाल्याचे व त्यासाठी काही पैसे उसने देण्याची गळ घातली. पीडितेने त्यावेळी त्याला 20 हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने वेळोवेळी पीडितेला वेगवेगळी कारणं सांगत पैशांची मागणी केली आणि पीडितेनेही ‘प्रेमासाठी’ कर्जबाजारी होवून त्याला तब्बल 30 लाख 57 हजार 79 रुपयांची रक्कम पाठवली.

गेल्या 2 मे रोजीही आरोपीने पीडितेला फोन करुन ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय, मी घर सोडून आलोय, तू आत्ताच्या आत्ता शिर्डीला ये’ असे सांगितल्याने पीडिताही लगेच शिर्डीला गेली. तेथेही त्याने पुन्हा ‘लग्नाचा’ उल्लेख करीत तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी पीडितेने त्याला पुन्हा घरी जाण्यास आणि राग सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर तो आळंदीला निघून गेला, मात्र नंतर त्याने पीडितेचे फोन घेण्यास टाळाटाळ सुरु केली. गेल्या 5 मे रोजी त्याने पुन्हा पीडितेला फोन करुन ‘मला घर सोडायचंय, मी घरी राहणार नाही, तुझे पैसे देवून टाकेल, लवकरच तुझ्याशी लग्न करेल, तू आपला प्रकार कोणाला सांगू नकोस व पैशांबद्दल बोलू नकोस, नाहीतर तुझ्या मुलीला मारुन टाकील’ अशी धमकीही दिली. त्यानंतरही पीडितेने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हापासून तो बंदच आहे.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर त्या 38 वर्षीय विधवा पीडितेने शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनीही त्याची तत्काळ दखल घेत एकीकडे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असताना दुसरीकडे आळंदी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना आरोपीला ताब्यात घेण्याची सूचना केली, आळंदी पोलिसांनी त्याचे घरही गाठले. मात्र तो तेथून पसार झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आरोपी योगेश सुभाष टोपेकर याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (2) (एन) ख 420, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *