ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद जोशी यांचे निधन राजस्थानी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष; 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्‍वास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील राजस्थानी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद केशव जोशी (वय 80) यांचे आज पहाटे सव्वादोन वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, त्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय आर्युविमा महामंडळाचे जुन्या काळातील विकास अधिकारी म्हणूनही त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. संगमनेरात त्यांना ‘जीके’ अशा नावाने ओळखले जात. राजस्थानी ब्राह्मण समाज विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती.

गोविंदराव जोशी म्हणजे कलाकार मनाचा जिंदादिल माणूस. प्रपंचाचा गाडा हाकतांना त्यांनी वेगवेगळ्या कलाही आत्मसात केल्या होत्या. राजस्थानी ब्राह्मण समाजातील प्रसिद्ध दिवंगत भजनसम्राट श्यामसुंदर भेडा यांच्यासमवेत ते ढोलकी वादन करीत असत. 1960 च्या दशकांत त्यांनी टेलरिंगचेही काम केले होते. त्याच दरम्यान भारतीय आर्युविमा मंडळाचे विमा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामकाजास सुरुवात केली. मधूर वाणी आणि हास्यविनोदाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच विमा मंडळातही आपला वेगळा दबदबा निर्माण केला होता.

राजस्थानी ब्राह्मण समाज विश्‍वस्त संस्थेच्या अध्यक्षपदी काम करतांना त्यांनी समाजाच्या जगदीश मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. स्वातंत्र्यपूर्व काळ अनुभवणारी व्यक्ती असूनही त्यांनी आपल्या समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरांना नेहमी विरोध केला. समाजातील सण-उत्सवातून प्रबोधन व्हावे, समाजाला एकोप्याचे महत्त्व समजावे आणि त्यातून सामाजिक प्रगती साधावी असा त्यांचा नेहमी आग्रह असत. नियमितपणे सकाळ-संध्याकाळ दहा किलोमीटर फिरण्याच्या त्यांच्या सवयीने वयाच्या 80 व्या वर्षीही ते चिरतरुणासारखे वाटायचे.

अत्यंत उत्साही आणि हास्यविनोदाने समोरच्यावर छाप पाडण्याच्या त्यांच्या शैलीने संगमनेरात त्यांनी मित्रांचा मोठा जमाव केला होता. गेल्या पंधरवड्यात प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून सावरत असतांनाच आज (ता.25) पहाटे सव्वादोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आज (ता.25) दुपारी चार वाजता त्यांच्यावर संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुलं, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जिंदादिल मनाचा मोठा माणूस हरपल्याची भावना संगमनेरातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *