सावधान! चोरट्यांनी केलीत तालुक्यातील मोटर दुरुस्तीची दुकाने लक्ष्य! आता वरुडी फाट्यावरील घटना; एकाच्या दक्षतेने मुद्देमालासह चोरट्यांचे वाहन ताब्यात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर खुर्द शिवारातील सौरभ रहाणे यांचे इलेक्ट्रिक मोटर दुरुस्तीचे दुकान फोडून त्यातील सतरा मोटारी गायब करण्याच्या घटनेला 48 तास उलटायच्या आतच आता चोरट्यांनी आणखी एका तशाच दुकानाला लक्ष्य केले. मात्र ही गोष्ट जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या एकाच्या लक्षात आल्याने चोरट्यांचा बेत फसला. यावेळी चोरट्यांनी आपल्या चारचाकी वाहनातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र ‘त्या’ इसमाने चोरट्यांचा धैर्याने मुकाबला केल्याने त्यांना मुद्देमालासह आपले वाहन सोडून पळ काढावा लागला. या घटनेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरीही हाती लागलेल्या वाहनामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली आहे. त्यातून रविवारी पहाटे घडलेल्या आडवा ओढा येथील घटनेचा तपास लागण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.23) मध्यरात्री एकच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील वरुडी फाट्यावर घडला. येथे बिरेवाडीत राहणार्‍या नानासाहेब उमाजी भोसले यांचे माऊली इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड मोटर रिवायडिंगचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता ते आपले दुकान बंद करुन घरी गेले. आज पहाटे एकच्या सुमारास गुंजाळवाडी पठारावरील त्यांचे मित्र रवींद्र भोर कर्जुले पठार येथील जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून आपल्या दुचाकीवरुन घराकडे जात असतांना त्यांना सदरील दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसले.

त्यावरुन नानासाहेब भोसले दुकानात उशिरापर्यंत काम करीत असतील असा समज होवून त्यांनी आपली दुचाकी दुकानाजवळ नेवून भोसले यांना आरोळी दिली. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अधिक जवळ जावून पाहिले असता तोंड झाकलेले दोघेजण दुकानात उचकापाचक करीत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांचा संशय बळावल्याने ते दुकानाच्या दिशेने जावू लागताच आतील दोघे चेारटे बाहेर आले व तेथेच उभ्या असलेल्या पांढर्‍या रंगाच्या ह्युंदाई सॅन्ट्रो (क्र.एमचएच.15/सी.डी.2287) या वाहनाकडे धाव घेत त्यातून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र रवींद्र भोर यांनी हिंमतीने त्यांच्या वाहनासमोरच आपली दुचाकी उभी करुन त्यांचा मार्ग रोखला.

यावेळी भोर यांना हुलकावणी देवून पळून जाण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांमध्ये त्यांचे वाहन अडकल्याने आपण हाती लागू या भीतीने त्यांनी आपले वाहन तेथेच सोडून अंधारात पळ काढला. हा सगळा प्रकार आटोपल्यानंतर रात्री पावणे दोन वाजता दुकानाचे मालक नानासाहेब आपले बंधू गुलाब भोसले यांच्यासह बिरेवाडीतून वरुडी फाट्यावर पोहोचले. यानंतर त्या तिघांनीही दुकानात जावून पाहिले असता सर्वत्र उचकापाचक झाल्याचे आणि दुकानातील बहुतेक साहित्य गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी चोरट्यांनी तेथेच सोडून दिलेल्या वाहनाची तपासणी केली असता दुकानातून गायब झालेले वायडिंगसाठी वापरण्यात येणार्‍या तांब्याच्या तारेचे प्रत्येकी 12 हजार रुपये किंमत असलेले पाच बंडल व वीस हजार रुपये मूल्य असलेली स्क्रॅपमधील तांब्याची 30 किलो तार असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांना वाहनातच आढळून आला.

त्यासोबतच सदरील वाहनात एक लोखंडी पहार, कटर व अन्य साहित्य मिळून आले. याबाबत रात्री दोनच्या सुमारास घारगाव पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर काही वेळातच सहाय्यक फौजदार संजय विखे, पोलीस नाईक संतोष फड, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांनी घटनास्थळी जावून चोरट्यांना हुडकण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ते गायब झाले होते. पोलिसांनी ह्युंदई सॅन्ट्रो कार व त्यातील चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी माऊली दुकानाचे चालक नानासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 380, 461, 511 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार ए. आर. गाधले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रविवारी पहाटे संगमनेर खुर्द शिवारातील आडवा ओढा परिसरात असलेल्या सौरभ रहाणे यांचे साईकृपा इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड रिवायडिंग हे दुकान फोडून चोरट्यांनी विविध अश्वशक्तीच्या सतरा मोटर व वायडिंगची तांब्याची तार असा 70 हजारांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला होता. त्या घटनेत एकच चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला होता, तर पोलिसांनी त्यावेळी तेथे वावर असलेल्या एका सॅन्ट्रो कारसह एका मारुती ओमनी वाहनावर संशय व्यक्त केला होता. या घटनेत ह्युंदाई सॅन्ट्रो कारच पोलिसांच्या हाती लागल्याने त्यावरुन आता चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त झाला असून आडवा ओढा येथील चोरीच्या प्रकाराचा छडा लागण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.


आडवा ओढा येथील रात्रीच्यावेळी सामसूम असलेल्या भागात झालेल्या ‘त्या’ घटनेने चोरटे बंद असलेली घरे व दुकाने लक्ष्य करीत असल्याचे वाटत असताना चोरट्यांच्या ‘या’ टोळीकडून इलेक्ट्रिक मोटर रिपेअरिंग करण्याची ठिकाणंच लक्ष्य केली जात असल्याचे आता स्पष्ट झाल्याने ग्रामीण भागातील अशा दुकानांच्या चालकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. दुरुस्तीसाठी दुकानात येणार्‍या मोटारी सुरक्षित ठेवण्यासह दुकानांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही गरज यातून अधोरेखीत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *