सावधान! भंडादर्‍याचे उन्हाळी आवर्तन सुरु झाले आहे.. वाळूतस्करांनी पोखलेले पात्र; काळजी घेवूनच नदीत उतरण्याची गरज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून उन्हाळी हंगामातील दुसरे प्रदीर्घ आवर्तन रविवारी सुरु झाले. सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या या आर्वनातून पुढील महिनाभर प्रवरामाई वाहती राहणार आहे. त्यामुळे संगमनेरकरांना भर उन्हाळ्यात नदीत चिंब डुंबण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे, मात्र त्याचवेळी प्रवरामाई आता पूर्वीसारखी सुरक्षित राहिली नसल्याचे भानही सतत ठेवावे लागणार आहे. सततच्या वाळू उपशामुळे नदीपात्रात जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाल्याने गेल्याकाही वर्षात दरवर्षीच्या उन्हाळी आवर्तनात निष्पापांचा बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी जागृकतेने पात्रात उतरण्याची गरज असून लहान मुलांना सुरक्षा साधनांशिवाय नदीपात्रात पोहायला शिकवणं धोक्याचे ठरण्याची दाट शक्यता आहे.

दीर्घकाळ लांबलेला पाऊस आणि वारंवारच्या अवकाळीने कमी झालेली पाण्याची मागणी यामुळे यंदा भंडारदरा व निळवंडे धरणात मिळून यंदा 11 हजार दशलक्ष घनफूटाचा मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना कालवा सल्लागार समितीकडून दरवर्षी मार्च ते जून या कालावधीत दोन दीर्घकालीन उन्हाळी आवर्तनाचे नियोजन केले जाते. अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत सुरु असल्याने उन्हाळ्याचा हंगाम संगमनेरकरांना पर्वणीचा ठरत असतो. या कालावधीत नदीपात्रात पोहण्यासाठी येणार्‍यांसह सायंकाळी अबालवृद्ध नदीकाठी फिरायला येत असल्याने या कालावधीत प्रवरा परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यात वाळूतस्कर नावाची जमात मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्याकडून मानवतेचा दृष्टीकोन पायदळी तुडवून नागरी वावर असलेल्या घाटांचे परिसरही ओरबाडले गेले आहेत. त्यामुळे मोठा इतिहास असलेले येथील अनेक घाट मोडकळीसही आले असून त्याखाली मोठ्या कपारी निर्माण होवून कधीकाळी अध्यात्मिक मनशांती प्राप्त करुन देण्यासह पोहणार्‍यांना आनंद देणार्‍या बहुतेक घाटांचे रुपांतर आता जीवघेण्या श्रेणीत झाले आहे. त्यामुळे मागील काही वर्षात दरवर्षीच्या उन्हाळी आवर्तनात निष्पापांचे बळी जाण्याच्या घटना नियमितपणे घडत आहेत.

संगमनेरकर आणि प्रवरामाई यांचे नाते अतिशय घट्ट आहे. शहरात राहणार्‍या अनेकांना कोणत्याही संसाधनांशिवाय या नदीनेच पोहायला शिकवले आहे. दरवर्षी उन्हाळी हंगामातील सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी येणारी मंडळीही याच नदीपात्रात पोहण्याचा आणि जलक्रीडेचा आनंद घेत असते. मात्र आता या नदीचे स्वरुप पूर्णतः बदलले असून जागोजागी प्रचंड खड्डे, नदीच्या पारंपरिक प्रवाहात झालेले बदल, घाटांच्या परिसरातील जीवघेण्या कपारी, वाळू संपुष्टात येवून अनेक ठिकाणी साचलेला गाळ अशा अनेक कारणांनी अमृतवाहिनी असलेली प्रवरा आज जीवघेणी बनली आहे.

त्यामुळे संगमनेरकरांनी उन्हाळी आवर्तनाचा आनंद घेताना या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पोहता न येणार्‍यांनी आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय पात्रापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यासोबतच पोहता येत असणार्‍या लहान मुलांना एकटेच नदीवर न पाठवता पालकांनी त्यांच्यासोबत राहण्याचीही गरज आहे. सिंचनासाठी दरवर्षी सुटणारे उन्हाळी आवर्तन आनंददायी असले तरीही त्यातून घडणार्‍या दुर्घटना फार वेदनादायी ठरत आल्याचा मागील काही वर्षातील नियमित इतिहास आहे. त्यामुळे सावधान! उन्हाळी आवर्तन सुरु झाले आहे असे म्हणण्याची वेळ संगमनेरकरांवर आली आहे.


प्रवरेच्या उन्हाळी आवर्तनात साईबाबा मंदिर ते गंगामाता मंदिरापर्यंतच्या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. दररोज सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात महिला व मुली फिरायला येतात. त्यामुळे या भागात टवाळखोरांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यातून यापूर्वी शहरात जातीय तणावासारख्या घटनाही घडल्या आहेत. शहर पोलिसांनी हा इतिहास लक्षात घेवून अशा एखाद्या घटनेतून शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही यासाठी आवर्तनाच्या कालावधीत या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *