थोरात परिवार वारकरी संप्रदायाचा पाईक ः महंत रामगिरी जोर्वे येथे श्री दत्त मंदिराच्या सभामंडपाचा जिर्णोद्धार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐतिहासिक जोर्वे संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या गावात श्री दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण कार्यक्रमात हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे जणू प्रति पंढरपूर निर्माण झाले होते. मानवता धर्म सांगणार्‍या वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा असून थोरात परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक असल्याचे गौरवोद्गार सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे श्री दत्त मंदिराच्या सभामंडपाचा जिर्णोद्धार व संत सावली वस्तीवरील दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार मोनिका राजळे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, दुर्गा तांबे, कांचन थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीत थोरात, सविता पारीख, नवनाथ महाराज आंधळे, सुरेश थोरात, शरयू देशमुख आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी व हजारो भाविक उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय पंडितराव थोरात यांच्या संकल्पनेतून संत सावली वस्तीवर नव्याने हेमाडपंथी दत्त मंदिराची सुरेख कलाकृती प्रवराकाठी उभी राहिली आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूला बाबाजी बाबा व ग्रामदैवताचे छोटे मंदिर आहे. राजस्थानी दगडांमध्ये उभारलेल्या या मंदिरावर अत्यंत बारीक नक्षीकाम केलेले असून या मंदिराचा कळस हा 100 किलोचा आहे. मंदिरात श्री दत्त महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. मंदिराच्या आजूबाजूला हिरवाईने परिसर नटला असून निसर्गरम्य वातावरण प्रत्येकाच्या मनाला शांती देणारे ठरले आहे. या भक्तीमय सोहळ्यात महंत रामगिरी महाराज, आमदार बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते विधीवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात आले. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आल्या होत्या, घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.

याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले, जोर्वे गाव व परिसर कायम सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व आपल्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. दत्त महाराज हे सर्वांचे श्रद्धास्थान असून या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याने भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलणार आहे. स्वर्गीय पंडितराव थोरात यांच्या संकल्पनेतून संतसावली वस्तीवरील मंदिर सुद्धा अत्यंत भव्य दिव्य व आकर्षक निर्माण झाले आहे. प्रास्ताविक इंद्रजीत थोरात यांनी केले. याप्रसंगी मंदिराचे काम करणारे अभियंता बी. आर. चकोर यांच्यासह सर्व कारागिरांचा आमदार थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *