‘स्वयंपाकी’ बनला संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहाचा मालक! कार्यकारी अभियंत्याचे पाठबळ; सरकारी खर्चात रंगतात खासगी ओल्या पार्ट्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे कारभारी, लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती व अधिकार्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहांचा गैरवापर राज्याला नवा नाही. काही शासकीय वास्तूंमध्ये अनैतिक प्रकार घडल्याच्या बातम्या नेहमीच समोर येत असताना आता संगमनेरचे शासकीय विश्रामगृह देखील त्याला अपवाद राहिले नाही. शासनमान्य व्यक्तींच्या सुविधेसाठी उभारलेल्या येथील विश्रामगृहातील स्वयंपाकीच आता या वास्तूचा मालक बनला असून त्याने चक्क शासकीय मालमत्तेचा गैरवापर करीत आपली खासगी खाणावळ जोमात सुरु केली आहे. त्यासाठी त्याच्याकडून दररोज विश्रामगृहातील वातानुकुलित खोल्या व भोजनकक्षाचा सर्रास वापर होत असून हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. विशेष म्हणजे याच परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयासह कार्यकारी अभियंत्याचे निवासस्थान असूनही त्याचा हा खासगी धंदा बिनबोभाटपणे सुरु असल्याने त्याच्या उद्योगाला येथील अधिकार्‍यांचेही पाठबळ असल्याचे दिसून येत आहे.

जवळपास निम्म्याहून अधिक जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकामाचा उपविभाग असलेल्या संगमनेर शहरात एकमेव शासकीय विश्रामगृह आहे. पुणे व नाशिक महार्मावर बसस्थानकाजवळच विश्रामगृहाची वास्तू असल्याने तेथे नेहमीच राजकीय व्यक्ती, शासकीय अधिकारी व शासनमान्य महानुभावांची रेलचेल असते. त्यांच्या सुविधेसाठी शासनाकडून विश्रामगृहात एका स्वयंपाक्याची नियुक्ती करण्यात आली असून विश्रामगृहात दाखल असलेल्या व्यक्तींच्या चहापान व जेवणाची सशुल्क व्यवस्था त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा स्वयंपाकी संगमनेरच्या विश्रामगृहात कार्यरत असल्याने अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती व सरकारी अधिकार्‍यांशी त्याचे स्नेहाचे संबंध प्रस्थापित झाले आहेत.

येथील विश्रामगृहात मुक्कामी असलेल्यांना शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची सोय आहे. संबंधित स्वयंपाकी मांसाहारी जेवण बनविण्यात अतिशय वाकबदार असल्याने एकदा त्याच्या हाताची चव चाखणारा वारंवार जेवणासाठी शासकीय विश्रामगृहात येत असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातून राजकीय व्यक्ती व शासकीय अधिकार्‍यांकडून वारंवार होणार्‍या स्तुतीतून या स्वयंपाक्याचा आता ‘बेडूक’ झाला असून आपणच या इमारतीचे मालक असल्याच्या अविर्भावात सध्या तो वावरत आहे. त्यातूनच त्याने गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत अभ्यागतांच्या सुविधेसोबतच आपली खासगी खाणावळही थाटली असून त्यासाठी शासकीय विश्रामगृहाच्या मालमत्तेचा मनमानी वापर सुरु आहे.

या स्वयंपाक्याच्या हाताची चव संगमनेरात चर्चेचा विषय असल्याने विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी नेहमीच येथे पार्ट्या झोडीत असल्याचे चित्रही दिसते. त्यातच आता विश्रामगृहाशी काहीएक संबंध नसलेल्यांचीही या इमारतीत दिवसभर गर्दी दिसू लागली असून या शासकीय इमारतीचे खासगी खाणावळीत रुपांतर झाले आहे. सायंकाळी येथे जेवणासाठी येणारे बहुतेकजण सोबत ‘पार्सल’ घेवून येतात त्यांच्यासाठी विश्रामगृहातील हवी ती वातानुकुलित खोली लागलीच उघडली जाते. तेथे बसून सरकारी खर्चातील गारव्यात मनसोक्त दारु रिचवल्यानंतर तर्राट झालेल्या ग्राहकांची येथील शासकीय वातानुकुलित भोजनकक्षात जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यापोटी संबंधितांकडून शाकाहारी जेवणाचे अडीचशे ते चारशे आणि मांसाहारी जेवणाचे सहाशे ते एक हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात.

गेल्या कित्त्येक वर्षांपासून येथेच स्थिरावलेल्या या स्वयंपाक्याने सरकारी मालमत्तेचा बेकायदा वापर करुन आजवर लाखो रुपयांची माया जमवली आहे. शासकीय कार्यालये अथवा वास्तूंच्या आवारात मद्यपानास मनाई असतानाही संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहातील या स्वयंपाक्यामुळे ‘त्या’ नियमाला मात्र येथे दररोज हरताळ फासला जात असून विश्रामगृहाच्या आवारात दारुच्या बाटल्यांचे खच पडले आहेत. एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याकडून विश्रामगृहाचा इतका अर्निबंध गैरवापर सुरु असतानाही आवारातच कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना हा प्रकार माहिती नसावा असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. त्यामुळे या स्वयंपाक्याच्या येथील गैरप्रकारांना त्यांचेच पाठबळ असल्याचेही दिसून येते.

याबाबत संगमनेर श्रमिक पत्रकार संघाने या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला असून येथील वरीष्ठ अधिकार्‍यांच्या जाणीवपूर्वक निष्काळजीपणामुळे शासकीय विश्रामगृहातील गैरप्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे मुख्यमंत्र्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यावर शिस्तभंगाची कारवाई होवून त्याची येथून उचलबांगडी होईस्तोवर पत्रकार संघटना या विषयाचा पाठपुरावा करणार असून तसा इशारही वरीष्ठांना पाठविलेल्या तक्रारतून करण्यात आला आहे.


संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहातील स्वयंपाकीच नव्हेतर येथील संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट झाली असून एकीकडे शासकीय स्वयंपाक्याने सरकारी इमारतीतच खासगी खाणावळ सुरु केली असताना दुसरीकडे अन्य कर्मचारी प्रवासी नागरिकांकडून परस्पर पैसे घेवून कोणत्याही नोंदणीशिवाय त्यांना खोल्याही भाड्याने देतात. काही पत्रकारांनी मध्यंतरी केलेल्या स्टिंगमध्येही हा प्रकार उघड झाला असून कोणतीही ओळख नसलेले आणि संशयित भासणारे दोघेजण त्यावेळी विश्रामगृहाच्या वातानुकुलित खोलीत आढळून आले होते. त्यावरुन संगमनेरच्या विश्रामगृहात काय सुरु आहे हे स्पष्टपणे समोर येवूनही येथील व्यवस्था आहे तशीच कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *