महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंकडून आदर्श आचासंहितेचे उल्लंघन! थोरात गटाची तक्रार; शासकीय दौर्‍याचा बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधी नव्हे ते राजकीय महत्त्व प्राप्त झालेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्यातील विविध ठिकाणी या निवडणूका होत असल्या तरीही त्याची खरी रंगत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अनुभवयाला मिळत आहे. या दोन्ही ठिकाणच्या बाजार समित्यांसाठी विद्यमान आणि माजी महसूल मंत्र्यांचे पॅनल निवडणूक रिंगणात असून दोन्ही बाजूकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्यानंतर आता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाकडून विद्यमान महसूल मंत्र्यांच्या शासकीय दौर्‍यातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार असल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी शेतकरी विकास मंडळाच्या दोघा उमेदवारांनी जिल्हाधिकार्‍यांसह राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रारही दाखल केली आहे. थोरात गटाच्या या आरोपांना विखे गटाकडून काय उत्तर मिळते याकडे आता जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील आजी-माजी महसूल मंत्र्यांचे राजकीय वैर अवघ्या राज्याला परिचयाचे आहे. त्यातच विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता विधानसभा मतदार संघात संगमनेर तालुक्यातील 28 गावांचा समावेश असल्याने त्या माध्यमातून या दोघांमधील राजकीय संघर्ष वेळोवेळी दिसूनही आला आहे. यापूर्वी जिल्हा परिषद अथवा राज्य पातळीवरील निवडणुकांमध्येच या दोन दिग्गज नेत्यांमध्ये दिसणारा संघर्ष आता एकमेकांच्या मतदारसंघातही उघडपणे दिसू लागल्याने भविष्यात या दोन्ही मतदारसंघांना त्याचे कंप जाणवण्याची शक्यताही बळावली आहे. त्याचाच परिपाक शुक्रवारी संगमनेर आणि रविवारी पार पडत असलेल्या राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पहायला मिळत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या धुरळ्यात विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने आपापल्या विजयाचे दावे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी चंदनापुरी येथील प्रचारसभेत माजी मंत्री थोरात यांनी विखेंचे नाव न घेता निवडणुका लादल्याचा आरोप केला होता. त्यावर विद्यमान महसूल मंत्र्यांनी ‘तुम्ही संगमनेरात काय केले ते सांगा, मी राहात्यात काय केले ते सांगतो’ असे जाहीर आव्हान देत जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यातून उठलेली राजकीय राळ खाली बसण्यापूर्वीच आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आजच्या (ता.27) संगमनेर तालुक्यातील शासकीय दौर्‍यावरच बोटं ठेवण्यात आले असून या दौर्‍याचा वापर बाजार समितीच्या प्रचारासाठी केला जाणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार शंकर पाटील खेमनर यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांकडे तर विजय विठ्ठल सातपुते या उमेदवाराने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे (निवडणूक) याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या आदर्श आचासंहितेचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगत मतदानाच्या 24 तास अगोदर प्रचार बंद होण्याच्या नियमावर बोटं ठेवण्यात आले आहे. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी शासकीय बैठकांचे आयोजन केल्याकडे दोघाही तक्रारदारांनी निवडणूक आयोगाचे लक्ष्य वेधले आहे.

या तक्रारीनुसार महसूल मंत्री विखे पाटील आज (ता.27) जिल्ह्यात असून संगमनेर तालुक्यातील दौर्‍यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी ते शासकीय बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसह प्रमुख प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक व तलाठ्यांना निमंत्रित करण्यात आले असून मंत्र्यांच्या खासगी कार्यालयातून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरकरणी सदरची बैठक शासकीय भासत असली तरीही त्यातून राजकीय हेतू साधण्याचा डाव स्पष्टपणे दिसत असून या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकला जाण्याची दाट शक्यता आहे.

प्रथमदर्शनी हा प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे दिसत असल्याने मंत्री महोदयांना सदरची बाब निदर्शनास आणून देत सदरच्या बैठका रद्द कराव्यात किंवा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही त्यादृष्टीने सदरील बैठकांमध्ये सक्षम निवडणूक अधिकारी नियुक्त करुन संपूर्ण बैठकीचे चित्रण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बैठकांमध्ये शेतकरी मंडळाचे काही सदस्यही उपस्थित राहून बैठकीचे अवलोकन व गरज भासल्यास त्याचे चित्रीकरण करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या दोघा उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारींवर विद्यमान महसूल मंत्र्यांकडून मात्र अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही. ते काय उत्तर देतात याकडे मात्र आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य केंद्रीत झाले आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जिल्ह्यातच असून सकाळी 7 ते 10 यावेळेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 43 व्या स्मृतीदिनाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर सकाळी 11 वाजता तळेगाव येथील महाराजा लॉन्समध्ये तळेगाव, समनापूर व वडगाव पान जिल्हा परिषद गटांची आढावा बैठक, दुपारी अडीच वाजता घारगाव येथील बालाजी मंगल कार्यालयात बोटा व साकूर गटाची आढावा बैठक व दुपारी चार वाजता संगमनेरातील मालपाणी लॉन्स येथे धांदरफळ, संगमनेर खुर्द व घुलेवाडी गटाची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह विविध शासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *