वांबोरी येथील शेतकर्‍याचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू कांदा झाकून घराकडे परतताना अचानक कोसळली वीज


नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेला अवकाळी काही थांबण्याचे नाव घेईना. या अवकाळी पावसाचा फटका शेतीमालासोबतच आता माणसांना, जनावरांना आणि घरांना बसण्यास सुरूवात झाली आहे. गुरुवारी (ता.13) रात्री दहा वाजेच्या सुमारास वांबोरी (ता.राहुरी) येथील संकेत फार्मजवळ भर वादळात शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून जवळच असणार्‍या घराकडे निघालेल्या शेतकर्‍यावर वीज कोसळून त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळ झाले. या वादळात पावसापेक्षा विजांचा कडकडाट अधिक होता. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. वांबोरी येथील शेतकरी भाऊसाहेब रघुनाथ गांधले हे विजांचा कडकडाट सुरू असल्यामुळे त्यांचे बंधू तसेच भावजयी संकेत फार्मजवळील शेतामध्ये काढून ठेवलेले कांदे झाकण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी कांदे झाकून ठेवल्यावर जवळ असणार्‍या घराकडे परतत असताना भाऊ आणि भावजयी घराच्या ओट्यापर्यंत पोहचले आणि त्यांच्या मागे अवघ्या 20 फूट अंतरावर असताना जोरात वीज कडाडली आणि ती भाऊसाहेब गांधले यांच्या अंगावर कोसळली.

यामुळे शेतकरी गांधले यांच्या पाठीला मोठ्या प्रमाणात भाजल्याने जखम झाली. त्यांना तातडीने वांबोरीतील खासगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे गांधले कुटुंब गोंधळून गेले. घरातील कर्ता गेल्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अजूनही अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, शेतकर्‍यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. याबरोबरच जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी ठेवण्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *