संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांची बदली! कोविड संक्रमण व गणेश विसर्जनाचे पथदर्शी काम; नूतन तहसीलदारांची अद्याप प्रतीक्षा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्यांना अखेर चालू वर्षी मुहूर्त गवसला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पोलीस व महसूल प्रशासनातील बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू असून त्या अंतर्गत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्यापही कोणाची वर्णी लागलेली नाही. त्यांनी कोविड संक्रमणाच्या कालावधीत संगमनेरकरांसाठी केलेली धडपड आणि गणेशोत्सवातील बुडिताच्या घटना टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांचा उहापोह शहरातील अनेकांनी त्यांची भेट घेवून आभार व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.


सन 2020 मध्ये राज्यात कोविड संक्रमणाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी ग्रामीण शहर असतांनाही उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांनी आरोग्य यंत्रणेसह सर्व शासकीय विभागांची मूठ बांधून पथदर्शी काम केले. पहिल्या लाटेच्या काळात संक्रमणाचा वेग फारसा नव्हता, मात्र या रोगाबाबत जनमानसासह वैद्यकीय क्षेत्रही अनभिज्ञ असल्याने त्यावेळी बाधित झालेल्या रुग्णावर उपचार कोठे व कसे करावेत अशी आणीबाणीची स्थिती असतानाही संगमनेरात जिल्ह्यातील पहिले तालुकास्तरिय कोविड रुग्णालय सुरु झाले. त्याच दरम्यान काही खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून प्रशासनाने बाधित रुग्णांवर उपचारांचीही व्यवस्था केली होती.


दुसर्‍या संक्रमणात कोविडच्या संक्रमणाची गती आणि त्यावेळी निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे भयानक स्थिती उद्भवली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने त्यावर मात करुन संगमनेरात जवळपास दीड हजार रुग्णांवर एकाचवेळी उपचार व ऑक्सिजनची व्यवस्था केली. त्याकाळात राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडाही निर्माण झाला होता, मात्र प्रशासनाने तयार केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनमुळे जिल्ह्याच्या तुलनेत संगमनेरात मात्र नियमितपणे त्याचा पुरवठा केला गेला, त्याचे श्रेयही महसूल विभागातील या द्वयींना जाते.

संगमनेरच्या इतिहासात मागील काही वर्ष सलगपणे गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा नदीपात्रात बुडिताच्या घटना घडत होत्या. मात्र तहसीलदार अमोल निकम यांनी उत्साहाच्या या उत्सवातील या वेदनादायी घटना रोखण्यासाठी विसर्जनाचा संगमनेर पॅटर्न निर्माण करुन स्थानिकांना थेट नदीपात्रात जावून गणेश विसर्जन करण्यास मनाई केली. त्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या एकवीरा फाउंडेशन व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी गणेश मूर्तींच्या विधीवत विसर्जनाची सोय करुन त्यांच्या येथील कारकीर्दीत विसर्जनादरम्यान बुडिताची एकही घटना घडू दिली नाही.

राज्यात विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. मात्र त्याच दरम्यान विखे पाटील यांनी काँग्रस सोडून भाजपात प्रवेश केल्याने हा संघर्ष अधिक वाढला आणि त्याची झळही जास्त करुन महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना सोसावी लागली. त्यातूनच गौण खनिज उत्खननाचा मुद्दाही वारंवार उसळला, या सर्वांवर मात करीत तहसीलदार निकम यांनी गेली 4 वर्ष एक महिना आणि 22 दिवस संगमनेरात काम केले. इतका प्रदीर्घ कालावधी राजकीय हॉटस्पॉट असलेल्या संगमनेरात काम करण्याचा विक्रम केल्यानंतर अखेर त्यांची आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली असून त्यांनी संगमनेरचा पदभार सोडला आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचार्‍यांसह शहरातील विविध संस्था, संघटना व नागरिकांनी त्यांची भेट घेवून गेल्या चार वर्षांच्या काळात त्यांनी केलेल्या चांगल्या कामांचा उहापोह करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. संगमनेरकरांनी दिलेले प्रेम आणि येथील कामकाजातून मिळालेले अनुभव आयुष्यभर सोबत राहतील अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *