‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान अधिक सतर्कतेने राबवा ः थोरात

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान अधिक सतर्कतेने राबवा ः थोरात
एस. एम. बी. टी. दंत महाविद्यालयात कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोना साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. यामध्ये नागरिकांचाही चांगला सहभाग मिळाला आहे. मात्र, ग्रामीण भागात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असली तरी रॅपिड टेस्टमुळे हे रुग्ण लवकर सापडत असून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तरीही भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व देत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान अधिक सतर्कतेने राबवावे अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.


संगमनेरातील एस. एम. बी. टी. दंत महाविद्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी डॉ.सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.


या बैठकीत तालुका व शहरातील कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना, सहकारी संस्थांच्यावतीने सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर, तालुक्यातील रुग्ण तपासणी व्यवस्था याबाबतची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेऊन प्रशासकीय अधिकार्‍यांना काही सूचना केल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तालुका पातळी, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व गावनिहाय विविध आरोग्याच्या समित्या करुन नागरिकांमध्ये जनजागृती करावी. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावांचा समावेश आहे. मात्र चांगल्या वैद्यकीय सुविधा व नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळण्यासाठी पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन करावे. हा संकटाचा काळ असून या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे. नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. तरच कोरोनाची संपूर्णपणे साखळी तोडणे हे आपले सर्वांचे अंतिम उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होऊन तालुका कोरोना मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *