संगमनेर बाजार समितीसाठी आजी-माजी उपसभापतींमध्ये लढत शेवटच्या दिवशी विक्रमी 109 अर्ज दाखल; बुधवारी अर्जांची छाननी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यभर लौकिक असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.3) विक्रमी 109 अर्ज दाखल झाले आहेत. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांत ही लढत होवून विद्यमान सभापती विरुद्ध माजी उपसभापती असा सामना रंगणार आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कायमच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा वरचष्मा राहिलेला आहे. आता राज्य सरकार बदलले असून, येथील राजकीय समीकरणे देखील बदलू लागली आहेत. त्यातच कट्टर विरोधक असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील गेल्या काही दिवसांपासून संगमनेर मतदारसंघात सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात तीळमात्र शंका नाही. त्यादृष्टीने दोन्ही गटाच्या समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकार संस्था मतदारसंघातून 43, सोसायटी मतदारसंघातून 17, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून 17, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून 4 व ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून 8 असे एकूण 109 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, 5 एप्रिलला अर्जांची छाननी होवून 6 ते 20 एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. 30 एप्रिलला मतदान होवून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात निवडणूक रणधुमाळी सुरू झाल्याने राजकीय रण तापण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाच्या निवडणुकीत बाजार समितीचे विद्यमान सभापती शंकर खेमनर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी उपसभापती सतीष कानवडे हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरल्याने काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र, मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतात हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *