अहमदनगर जिल्ह्याचे महसुली उत्पन्न एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये! जिल्ह्यात कर्जत तालुका ठरला अव्वल तर कोपरगाव तालुक्यातून निचांकी वसुली


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतसारा, अकृषक कर, नजराणे यासह गौणखनिजाची रॉयल्टी आणि दंडातून अहमदनगरचा महसूल विभाग यंदाही मालामाल झाला आहे. जिल्ह्याने गेल्या आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या 105 टक्के वसुली केली आहे. यावर्षी जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधून 158 कोटी 8 लाख 97 हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षभरात टक्केवारीनुसार दक्षिणेतील कर्जत तालुक्यातून उच्चांकी 216 कोटी टक्के तर कोपरगाव तालुक्यातून निचांकी अवघी 48 टक्के वसुली झाली आहे. रुपयांमध्ये मोजमाप केल्यास अहमदनगर नंतर संगमनेर तालुक्यातून विक्रमी महसुली उत्पन्न जमा झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सात महसुली उपविभागांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 150 कोटी 41 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च अखेरीस जिल्ह्याने निश्चित उद्दिष्टांच्या पुढे जावून 158 कोटी 8 लाख 97 हजार रुपयांची वसुली केली आहे. टक्केवारीत गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याने उद्दिष्टांच्या 105.11 टक्के महसूल जमा करण्यात यश मिळवले आहे. महसूली उत्पन्नात जमीन महसूल वसुली, बिनशेती सारा, अनधिकृत अकृषक कर, नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर व इतर करातून ही रक्कम जमा झाली आहे. यातील 44 कोटी 69 लाख 45 हजार रुपयांची रक्कम जमीन महसुलातून तर 113 कोटी 39 लाख 52 हजार रुपयांची रक्कम गौणखनिज रॉयल्टी व दंडात्मक कारवाईतून वसुल करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी देण्यात आलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करताना कर्जत-जामखेड महसुली उपविभागाने 158.65 टक्के महसूल वसुली करतांना राज्याच्या तिजोरीत 25 कोटी 70 लाख 39 हजार रुपयांची भर घातली आहे. दुसर्‍या क्रमांकावर संगमनेर-अकोले उपविभागाने 133.37 टक्क्यांनी उद्दिष्ट ओलांडताना 29 कोटी 41 लाख 24 हजार रुपयांचे, तर तिसर्‍यास्थानी श्रीगोंदा-पारनेर उपविभागाने 115.14 टक्के वसुली करताना 22 कोटी 62 लाख एक हजार रुपयांचा भरणा केला आहे. चौथ्या क्रमांकावर अहमदनगर व नेवासा उपविभागाने 42 कोटी 13 लाख 26 हजार (106.84 टक्के), पाथर्डी-शेवगाव उपविभागाने 11 कोटी 19 लाख 77 हजार (91.18 टक्के), सहाव्या स्थानावर राहाता-कोपरगाव उपविभागाने 13 कोटी 73 लाख 68 हजार (67.37 टक्के) तर, सातव्या क्रमांकावर श्रीरामपूर-राहुरी उपविभागातून 13 कोटी 16 लाख 9 हजार रुपयांचे (64.50 टक्के) महसुली उत्पन्न जमा झाले आहे. तालुकास्तरावर रुपयांमध्ये सर्वाधिक महसूल देणार्‍या तालुक्यांमध्ये अहमदनगर 32 कोटी 16 लाख 22 हजार (109.62 टक्के), संगमनेर 22 कोटी 22 लाख तीन हजार (141.62 टक्के), कर्जत 18 कोटी 54 लाख 28 हजार (216.9 टक्के),


पारनेर 12 कोटी 88 लाख 89 हजार (132.04 टक्के), नेवासा 9 कोटी 97 लाख चार हजार (98.77 टक्के), श्रीगोंदा 9 कोटी 73 लाख 12 हजार (98.44 टक्के), राहाता 8 कोटी 19 लाख 70 हजार (93.35 टक्के), अकोले 7 कोटी 19 लाख 21 हजार (113.01 टक्के), जामखेड 7 कोटी 16 लाख 11 हजार (93.97 टक्के), राहुरी 7 कोटी 14 लाख 53 हजार (64.39 टक्के), श्रीरामपूर 6 कोटी एक लाख 56 हजार (64.64 टक्के), पाथर्डी 5 कोटी 73 लाख 94 हजार (88.93 टक्के), कोपरगाव 5 कोटी 53 लाख 98 हजार (47.72 टक्के) तर शेवगाव तालुक्यातून 5 कोटी 45 लाख 83 हजार रुपये (93.67 टक्के) महसुली उत्पन्न मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *