रस्ता अपघातात आणखी एक कोवळा जीव गमावला! समनापुरातील दुर्दैवी घटना; महाविद्यालयातून घरी जाणारा विद्यार्थी ठार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरवड्यापासून संगमनेर तालुक्याच्या विविध भागात एकामागून एक घडणार्‍या अपघाती घटनांमध्ये तरुण वयाची मुले बळी पडण्याचे दुर्दैवी प्रकार अजूनही सुरुच असून त्यात आज आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयातून वडगावपान येथील आपल्या घराकडे जाणार्‍या विद्यार्थ्याची दुचाकी मळी घेवून जाणार्‍या टँकरखाली आल्याने चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत संजय गडगे असे अपघातात जीव गमावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. या घटनेने वडगाव पानसह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा अपघात आज (ता.29) सकाळी अकराच्या सुमारास समनापुरातील मशिदीसमोर घडला. संगमनेरातील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकणारा अनिकेत संजय गडगे (वय 17, रा.वडगाव पान) हा आपल्या मोपेडवरुन घराकडे जात होता. त्याची मोपेड समनापुरात आल्यानंतर पुढ्यात चाललेल्या एका पायी दिंडीला ओलांडीत असतांना पाठीमागून आलेल्या व लोणीच्याच दिशेने जाणार्‍या मळीच्या टँकरला (क्र.एम.एच.12/एच.डी.7222) पाठीमागच्या बाजूने त्याची मोपेड धडकली.

यातून सावरण्यापूर्वी तो टँकरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने चिरडला गेला व जागीच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी धावलेल्यांनाही समोरचे चित्र पाहून चक्कर यावी. विशेष म्हणजे या अपघातात त्याच्या मोपेडचे किरकोळ नुकसान झाले असून अपघात झाल्यानंतर त्यांच्या पाठीवरील दप्तर तसेच असल्याने ते दृश्य पाहून अनेकांची मने हेलावली. या घटनेबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अपघातास कारणीभूत ठरलेला टँकर व त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने वडगाव पानसह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *