घारी शिवारात मालवाहू वाहनांचा भीषण अपघात टेम्पो चालकाचा हात कोपरापासून तुटला; दोन्ही वाहने चक्काचूर


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीत झगडे फाट्याच्या पश्चिमेला खडकी नदीजवळ कंटेनर व आयशर टेम्पो दोघांची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा उजवा हात कोपरापासून तुटून पडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आयशर टेम्पो (एमएच.47, एएस.3874) हा झगडे फाट्याकडे चाललेला होता, त्याचवेळी समोरून झगडे फाट्याच्या दिशेने देर्डे फाट्याकडे विरुद्ध बाजूने जाणारा कंटेनर (क्र. एमएच.43, यू.7155) येत होता. कंटेनर विरुद्ध बाजूने येत असल्यामुळे आयशर टेम्पो चालकाला त्याचा अंदाज आला नाही व त्यांची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. आयशर टेम्पोचा चालक कलाम शेख यांचा उजवा हात कोपरापासून तुटून पडलेला असल्याचे समजले.

सदर कंटेनरमध्ये बियरच्या बाटल्या भरलेल्या होत्या व आयशर टेम्पोत भंगार भरलेले होते. बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान अपघातस्थळी तातडीने पोलिसांनी भेट दिली. दोन्हीही वाहनांचे चालक बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल आर. डी. शेख, आर. के. आरवडे, वाहतूक शाखेचे पो. ना. भगवान ढाका, पो. कॉ. प्रकाश नवाळी, गृहरक्षक दलाचे जवान अंकुश आहेर यांनी जखमींना पुढील उपचारांसाठी कोकमठाण येथील एस. जे. एस हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. पोलिसांनी ताबडतोब जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान सिन्नर-शिर्डी महामार्गचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून या महामार्गामुळे वाहनांचा वेग देखील वाढला आहे. काही ठिकाणी पुलाची कामे तसेच उड्डाणपुलाची कामे अजून प्रगतीपथावर असल्यामुळे बर्‍याच ठिकाणी एकेरी वाहतूक तर काही ठिकाणी अचानक वळण घ्यावे लागते. त्यामुळे बरेचदा वाहन चालकांची धांदल उडते. तसेच या महामार्गाला देर्डे फाटा ते झगडे फाटा दरम्यान कुठेही कट पॉईंट नसल्यामुळे दुसर्‍या बाजूला जाणार्‍या वाहनांना दूरवर जाऊन वळून मागे यावे लागते. बर्‍याचदा वाहन चालक या गोष्टीचा कंटाळा करतात व विरुद्ध दिशेने वाहन चालवतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *