वेगवेगळ्या अपघातात तालुक्यातील दोघांचा मृत्यू! प्रभात डेअरीच्या टँकरने पुन्हा घेतला बळी; चार वर्षांच्या चिमुरडीचाही मृत्यू..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यांवर अपघात होवून त्यात निष्पापांचे बळी जाण्याच्या घटना सुरुच आहेत. सोमवारी या घटनांमध्ये आणखी दोन अपघातांची भर पडली असून पहिल्या घटनेत प्रभात दूध डेअरीच्या टँकरने तळेगावातील तरुणाच्या मोटारसायकलला समोरुन धडक देत त्याचा जीव घेतला. तर, मेंढवणमध्ये घडलेल्या दुसर्‍या घटनेत घराच्या अंगणात खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुरडीला डंपरने चिरडल्याने त्यात तिचा बळी गेला. दोन्ही वाहनांच्या चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभात दूध डेअरीच्या टँकरचा चालक मात्र पसार झाला आहे. या दोन्ही घटनांनी तळेगाव व मेंढवण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत तालुका पोलीस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना तालुक्यातील तळेगाव शिवारातील लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर घडली. तळेगावमध्ये राहणारा रवींद्र बाबासाहेब पवार (वय 32) हा तरुण सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पिंपळे येथील खडीक्रशरवरुन घराकडे येत असताना त्याची दुचाकी हॉटेल कमलेशजवळ येताच समोरुन भरधाव वेगाने आलेल्या प्रभात दूध डेअरीच्या टँकरने (क्र.एम.एच.17/बी.डी.4504) त्याच्या दुचाकीला (क्र.एम.एच.17/बी.जी.765) समोरासमोर जोरदार धडक दिली. या घटनेनंतर टँकरचालकाने जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित असताना त्याने जीवाच्या भीतीने आपले वाहन तेथेच सोडून पळ काढला.

यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रवींद्र पवार याला सुरुवातीला तळेगावातील खासगी दवाखान्यात व नंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयताचा छोटा भाऊ किरण बाबासाहेब पवार याने रात्री उशिराने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन प्रभात दूध डेअरीच्या टँकर चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) सह 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायद्याचे कलम 134 (अ) (ब), 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

या घटनेनंतर अवघ्या अर्ध्यातासाच्या अंतराने दुसरी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली. या घटनेत तालुक्यातील मेंढवण येथील माळवाडी वस्तीवर राहणार्‍या रमजान अहमद पठाण (वय 60) यांची अवघ्या चार वर्षांची नात घराच्या अंगणात खेळत होती. त्याचवेळी त्यांच्या घरासमोर राहणार्‍या डंपर मालकाचा चालक तेथे आला व त्याने आसपासच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मालकाच्या घरासमोर लावलेला डंपर (क्र.एम.एच.04/एफ.डी.4176) तसाच मागे घेतला. त्यात पाठीमागील टायरखाली चार वर्षांची माही अजीज पठाण ही चिमुरडी चिरडली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ऐन रमजानमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत अवघ्या चार वर्षांची मुलगी ठार झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीतून हळहळ व्य केली जात आहे.

याप्रकरणी आज पहाटे दोनच्या सुमारास मयत मुलीचे आजोबा रमजान पठाण यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी डंपरचा चालक राजेंद्र भागवत बढे याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) सह 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांच्याकडे देण्यात आला आहे. एकाच दिवशी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये दोघांचा बळी गेल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


गेल्या 17 मार्च रोजी प्रभात दूध डेअरीच्या टँकरने धडक दिल्याने तालुक्यातील चिखलीचे रहिवाशी असलेल्या ऋषीकेश उमाजी हासे, सुयोग बाळासाहेब हासे व नीलेश बाळासाहेब सिनारे या तिघा तरुणांचा बळी गेला होता. या घटनेनंतरही टँकरचालक वाहन सोडून पळून गेला होता. तसाच प्रकार सोमवारी (ता.27) सायंकाळी सातच्या सुमारास लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर घडला. या घटनेतही प्रभातच्या टँकरने धडक दिल्याने रवींद्र बाबासाहेब पवार या 32 वर्षांच्या तरुणाचा बळी गेला आणि त्याचा जीव घेणारा चालक मात्र घटनास्थळावरुन पसार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *