वडनेर येथे शस्त्रांचा धाक दाखवून धाडसी चोरी राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल; परिसरात पसरले भीतीचे वातावरण


नायक वृत्तसेवा, राहुरी
आसपासच्या घरांना बाहेरुन कडी लावून सहा चोरट्यांनी वडनेर (ता.राहुरी) येथे राजेंद्र दादा दिवे यांच्या घरात चाकू व कुर्‍हाडीचा धाक दाखवून मारहाण करत रोख रकमेसह दोन तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घडना घडली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राजेंद्र दिवेंचा एक महिन्यापूर्वी सारंगधर जांभुळकर याच्या सोबत किरकोळ वाद झाला होता. त्याबाबत राहुरी पोलिसांत तक्रार दिलेली आहे. मंगळवारी (ता.21) राजेंद्र दिवे हे त्यांच्या घरात झोपलेले होते. बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा लोटल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. तेव्हा सहा चोरटे घरात घुसले. त्यावेळी त्यांनी राजेंद्र दिवे व त्यांच्या घरातील महिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि कुर्‍हाड व चाकूचा धाक दाखवून कपाटाची चावी घेतली.

चोरटे कपाटातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 35 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 63 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. या घटनेनंतर राजेंद्र दिवे हे शेजारी राहणारा मुलगा व पुतण्या यांना उठविण्यासाठी गेले असता त्यांच्या घराला बाहेरुन कडी लावल्याचे दिसून आले. यानंतर राजेंद्र दिवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सारंगधर जांभुळकर, सचिन येळे, सोमनाथ येळे (तिघे रा. वडनेर, ता. राहुरी) तसेच त्याच्याबरोबर असलेले इतर तीन अनोळखी इसम अशा सहा जणांवर गुरनं. 315/2023 भादंवि कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *