लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने तिसर्‍या दिवशी केले पलायन तमनर आखाडा येथील तरुणाची दोन लाखांची फसवणूक; राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, राहुरी
दोन लाख रुपये घेऊन लग्न केलेल्या नवरीने सासरी आल्यानंतर तिसर्‍या दिवशी रात्रीच्या वेळी तिच्या नातेवाईकांसह पलायन केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत पोलिसांत सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक भाउसाहेब खेमनर (वय 28) हा तरुण राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे राहत असून तो महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. त्याला लग्नासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. त्याच्या एका नातेवाईकाने मुलगी पाहिली असून दोन लाख रुपये द्या, असे फोन करून सांगितले. तेव्हा अशोक हा त्याच्या आईवडीलांसह पारनेर येथे गेला. तेव्हा मुलगी हिंगोली येथे असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार 3 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर हा आईवडील, नातेवाईकांसह अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, ता. कळनोरी, जि. हिंगोली) या महिलेच्या घरी गेले. तेथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला.

मुलगा व मुलीची एकमेकांची पसंती झाली. मात्र दोन लाख रुपये द्यावे लागतील तरच लग्न होईल. अशी अट मुलीच्या नातेवाईकांनी घातली. अशोक खेमनर याने वेळोवेळी संबंधित लोकांना 1 लाख 85 हजार रूपये दिले. त्यानंतर 5 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर या तरुणाचे लग्न सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, जुनी वस्ती, सारसी बडनेरा, अमरावती) या तरुणीबरोबर लावण्यात आले. अशोक खेमनर हा नवरीला घेऊन तमनर आखाडा येथे त्याच्या घरी आला. त्यानंतर 8 जुलै 2022 रोजी पत्नी सोनी हिच्या नातेवाईकांनी तमनर आखाडा येथे मुक्काम केला. रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण एकाच घरात झोपले. 9 जुलै 2023 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास अशोक खेमनर याची पत्नी व तिचे नातेवाईक घरातून गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांचा शोध घेतला असता ते कोणीही मिळून आले नाही. याबाबत मध्यस्थी लोकांकडे चौकशी केली असता सदर मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत निघून गेली. आम्ही दोन-तीन दिवसांत मुलीला तुमच्या घरी आणून घालू असे सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत पत्नी आली नाही.

शेवटी लग्न लावून आपली 1 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अशोक खेमनर याने राहुरी पोलिसांत फिर्याद दिली. यावरुन चंदू सीताराम थोरात (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), भाऊसाहेब वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), श्याम वाबळे (रा. वासुंदे, ता. पारनेर), अनिता रामचंद्र आग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, ता. कळनोरी, जि हिंगोली), सुनील शरद कांबळे (रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), राहुल पाटील, सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, जुनी वस्ती सारसी, बडनेरा, अमरावती) या सात जणांवर गुरनं. 295/2023 भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *