दुर्दैवी घटना! चिखलीतील तिघा तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू!! पंचक्रोशीत शोककळा; दुधाच्या टँकरला समोरासमोर धडक, एकजण गंभीर जखमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

अवकाळी पावसाच्या भयाने बळीराजा आपले नुकसान कमी करण्यासाठी अंधाऱ्या रात्रीही वावरात राबत असताना तालुक्यातून अतिशय वेदनादायी घटना समोर आली आहे. या घटनेत संगमनेरातून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडक बसल्याने झालेल्या भिषण अपघातात तिघांचा बळी गेला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत तरुण तालुक्यातील चिखलीचे रहिवासी असून या घटनेने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची दुर्दैवी घटना आज (ता.17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ घडली. संगमनेरातून चिखलीच्या दिशेने आपल्या घराकडे निघालेले चौघे तरुण दोन मोटरसायकल वरुन गप्पा मारीत जात होते. यावेळी मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ अकोल्याकडून आलेल्या दुधाच्या टँकरला दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण अत्यवस्थ झाला.

या वाहनांच्या धडकेने झालेला प्रचंड आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी संगमनेर शहर पोलिसांनाही माहिती दिल्याने शहर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. नागरिक व पोलिसांनी चौघाही तरुणांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकजण अत्यावस्थ असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

 

या अपघातात मयत झालेले तिघेही तरुण संगमनेर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली गावचे रहिवासी आहेत. मयत झालेल्या तरुणांची नावे ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20) व निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही या. चिखली, ता. संगमनेर) अशी आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) असे असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या भीषण अपघातात एकाच वेळी तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने चिखलीच्या पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जखमी असलेल्या तरुणावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून मयत झालेल्या तिघाही तरुणांचे मृतदेह पालिकेच्या शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर शहर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून दुध टँकरच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *