संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांचा दिवसा धुमाकूळ! भर दुपारी दोन घरे फोडली; दागिन्यांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध गुन्हेगारी घटनांमुळे नेहमी चर्चेत राहणार्‍या तालुक्याच्या पठारभागाला आता चोरट्यांचे ग्रहण लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी रात्री-अपरात्री घडणार्‍या चोरीच्या घटना दिवसाढवळ्या घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी असाच प्रकार समोर आला असून चोरट्यांनी भरदुपारी माळवाडी परिसरातील दोन बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व चक्क महत्त्वाची कागदपत्रे लांबविली. सायंकाळी उशिराने हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरच्या दोन्ही घटना बोटा अंतर्गत असलेल्या माळवाडी शिवारातील वाघ वस्तीवर बुधवारी (ता.15) दुपारी एक ते सायंकाळी पाच या दरम्यान घडल्या आहेत. या भागात राहणार्‍या संगीता बाळू वाघ या कामानिमित्ताने बाहेर गेल्या असता चोरट्यांनी डाव साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील सामानाची उचकापाचक करुन वाघ यांनी घराच्या बांधकामासाठी साठवून ठेवलेली लोखंडी पेटीतील 45 हजार रुपयांची रोख रक्कम घेवून आपला मोर्चा शेजारीच असलेल्या अन्य एका घराकडे वळवला. सदरचा प्रकार त्या सांयकाळी घरी परतल्यावर समोर आला.

संगीता वाघ यांच्या घराजवळच विठ्ठल राघुजी वाघ (वय 74) हे आपल्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. त्यांच्या पत्नीला किडणी विकार असल्याने ठराविक कालावधीत त्यांना तपासणीसाठी मुंबईला जावे लागते. त्यानुसार बुधवारी पहाटे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या घराला कुलूप लावून मुंबईला गेले होते. मुंबईतील कामकाज आटोपून रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दोघेही माळवाडीत आले असता त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. त्यापुढे जावून त्यांनी घराचा दरवाजा बघितला असता त्याचेही कुलूप तोडल्याचे त्यांना आढळले.

त्यावरुन घरात चोरी झाल्याचा अंदाज आल्याने या दाम्पत्याने आत जावून अघितले असता संपूर्ण घरात उचकापाचक झाल्याचे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यावेळी विठ्ठल वाघ यांनी ऐवज ठेवलेले कपाट आणि लोखंडी पेटी तपासली असता त्यांचीही कुलूपे तोडून त्यातील सामानाची उचकापाचक झाली होती. या दाम्पत्याने कपाटात जपून ठेवलेले 1 लाख 80 हजार रुपयांचे सहा तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र, 60 हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या दोन अंगठ्या, 15 हजार रुपयांचह सोन्याची अर्धातोळा नथ, 10 हजारांचे मुलांचे चांदीचे कंबरपट्टे व पैंजण, पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि चक्क गटवारी वाटपाच्या मूळ कासगदपत्रांसह दोन बँकांचे पासबुक असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या प्रकाराने भयभीत झालेल्या या वृद्ध दाम्पत्याने लागलीच बोट्याचे पोलीस पाटील संजय जठार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांना कळविले. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी वाघ वस्तीवरील दोघांच्या घरात असाच प्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर रात्री उशिराने दोघांच्याही तक्रारी दाखल करुन घेण्यात आल्या. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने पठारभागात पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून त्याचा छडा लावण्याचे आव्हान घारगाव पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांच्याकडे देण्यात आला आहे.


यापूर्वी घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या संपूर्ण कारकीर्दीत पठारभागात असंख्य चोर्‍यांसह घरफोड्या, दरोडे यासारख्या गंभीर घटनाही घडल्या. मात्र त्यातील एकाही प्रकरणाचा शोध लावून आरोपींना गजाआड करण्यात त्यांना एकदाही यश आले नाही. आता घारगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या खांद्यावर असून त्यांची आत्तापर्यंतची येथील कारकीर्द समाधानकारक असल्याने त्यांच्याकडून या घटनांचा तपास लागेल अशी पठारभागातील नागरिकांना अपेक्षा आहे, ती वास्तवात उतरते की पहिले पाढे पंच्चावन्न प्रमाणेच राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *