शाकीरदरावाडीचा पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष संपला! ए. एस. के. फाउंडेशनसह बायफच्या सहकार्यातून खोदली विहीर


महेश पगारे, अकोले
ए. एस. के. फाउंडेशन मुंबई व बायफ संस्था संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी, जहागिरदारवाडी, चिंचोडी, मुरशेत, पांजरे या आदिवासी गावांमध्ये जलस्रोत निर्मितीसाठी व पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. याच प्रकल्पातील पांजरे गावातील शाकीरदरावाडीमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याची वणवण थांबली नव्हती. ही बाब प्रकल्पाच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरले आणि हा प्रश्न प्रत्यक्ष श्रमदानातून निकाली लागला.

शाकीरदरावाडीत ठाकर समाजाची सुमारे 25 घरे कळसूबाई परिसरातील डोंगराच्या कुशीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. जोरदार पावसाचा हा प्रदेश मानला जातो. धरणातील पाणीसाठा खोलवर गेल्यानंतर गावची तहान भागवण्यासाठी महिलांना वणवण करत फिरावे लागते. पाण्याच्या शोधात डोक्यावर हंडा घेऊन महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते. त्यातूनच शाकीरदरावाडी दूर डोंगरात वसलेली असल्याने तिथे उन्हाळ्यात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष असायचे. वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या कधीही संपू शकत नाही असेच इथल्या लोकांना वाटत होते. ही समस्या समजून घेत प्रकल्पाने अतिशय जलद गतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे ठरवले. वाडीतील लोकांनीही पिण्याच्या पाण्यासाठी श्रमदान करण्याचे मान्य केले.

विहिरीसाठी पाणी परीक्षण तांत्रिक पद्धतीने करण्यात आले. ज्या भागात वर्षभर पाणी उपलब्ध राहील त्या जागेची निवड भूगर्भ तज्ज्ञांकडून करण्यात आली. तत्काळ अंदाजपत्रक तयार करून मंजूर करून घेण्यात आले. सुमारे एक महिन्याच्या कालावधीतच विहीर खोदून बांधकाम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. भर उन्हाळ्यात विहिरीला असलेले भरपूर पाणी बघून ग्रामस्थ सुखावले आहे. शाश्वत आणि वर्षभर पुरणारे पाणी वाडी जवळच उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहात संचारला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पाणी वापर समिती तयार करून त्यांच्याकडे विहीर व जलस्रोत हस्तांतरित करण्यात आला आहे.

या प्रकल्पाला ए. एस. के. फाउंडेशन मुंबईचे सी. एस. आर. हेड सिद्धार्थ अय्यर व प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने तसेच बायफ संस्थेचे राज्य समन्वयक सुधीर वागळे व विभाग प्रमुख जितीन साठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी बायफ संस्थेचे कर्मचारी जलतज्ज्ञ रामनाथ नवले, विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, वर्षा भागडे, मच्छिंद्र मुंढे, सुनील बिन्नर यांच्यासह श्रावण उघडे, राजू उघडे, बबन उघडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *