जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचार्‍यांचा संप आणि नागरिकांची परवड! सरकारचा प्रस्ताव फेटाळून राज्यात संप; संगमनेरात मोर्चा काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध कर्मचार्‍यांच्या संघटनांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली आणि आज सकाळपासून राज्यातील 17 लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचार्‍यांनी संप पुकारुन सरकार विरोधात एल्गार पुकारला. संगमनेरातही या संपाचा मोठा परिणाम दिसून आला असून कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शाळांच्या परिसरात शुकशुकाट अनुभवायला मिळाला. त्यामुळे कामानिमित्त संगमनेरात आलेल्या अनेक नागरिकांची परवड झाल्याचे चित्रही दिसून आले. आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी संगमनेर तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनांनी सोमवारी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर आजपासून संपाची हाक देत प्रशासकीय भवनावर मोर्चाही काढला. यावेळी झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ‘एकच मिशन, जुनी पेंशन’ यावर झोत टाकण्याचा प्रयत्न केला.

राज्य शासकीय सेवेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना जुन्या पद्धतीने निवृत्तीवेतन योजना लागू न करता त्यांच्यासाठी नवीन अंशदायी योजना लागू करण्यात आली. मात्र या योजनेला राज्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनांसह जिल्हा परिषदा, नगरपालिका, शासकीय अनुदानप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुरुवातीपासून विरोध करीत सरसकट जुनी निवृत्तीवेतन योजना कायम ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी आजपासून (ता.14) संपाचा इशारा देण्यात आला होता.

हा संप होवू नये व त्याचा परिणाम राज्याच्या जनतेला सोसावा लागू नये यासाठी राज्य सरकारने सोमवारी अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी संघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटनांसह राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचारी संघटनांना संपापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तयारीही या द्वयींनी दाखवली. मात्र सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचे सांगत संघटनांनी संपाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज सकाळपासून राज्यासह संगमनेरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांची आवारे ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी विद्यार्थी गेले, मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच न आल्याने अनेक शाळांनी केवळ राष्ट्रगीत घेवून मुलांना घरी पाठवून दिल्याचेही समोर आले आहे.

याशिवाय संगमनेर उपविभागात अकोले तालुक्याचाही समावेश असल्याने येथील शासकीय कार्यालयांमध्ये नेहमीच लोकांचा मोठा राबता असतो. दूर ग्रामीणभागातून अनेकजण मिळेल त्या साधनाने आपली कामे करण्यासाठी संगमनेरात येतात. मात्र आज सकाळपासूनच कर्मचार्‍यांचा संप सुरु झाल्याने कामानिमित्त संगमनेरात आलेल्या ग्रामीण नागरिकांची परवाड झाल्याचेही दिसून आले. संपाचा आजचा पहिलाच दिवस असला तरीही या संपाने संगमनेरातील शासकीय रुग्णालय, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, पंचायत समिती, तहसील अशा विविध कार्यालयांमधील कामकाज पूर्णतः बाधित झाले आहे.

संगमनेरातील विविध कर्मचारी संघटनांनी सुरुवातीला तहसील कार्यालयाचा आवारात घोषणाबाजी केल्यानंतर तेथून नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवन गाठले. सुमारे तासभर याठिकाणी ठिय्या देत कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या पेन्शन योजनेचे गोडवे गात जोपर्यंत सरकार ती लागू करणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे वक्तव्य केले. या संपाला राजपत्रित अधिकारी संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला असून या मागणीवर निर्णय न झाल्यास 28 मार्चपासून संपात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे. तर, शासनानेही हा संप मोडून काढण्यासाठी मेस्मा, शिस्तभंग यासारखी हत्यारे उपसल्याचे बघायला मिळत आहे.

राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेअभावी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी सोमवारी रात्री आदेश काढीत प्रशासकीय सेवा, आरोग्य विषयक सेवा, पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक सेवांबाबत नागरिकांना काही अडचणी असल्यास (0241-2323844) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


आजपासून सुरु झालेल्या संपात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले आहेत. मात्र त्याबाबत सोमवारी विद्यार्थ्यांना कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. त्याचा परिणाम आज सकाळी लहान लहान मुले तयार होवून शाळेतही दाखल झाली, मात्र शाळेत गुरुजींचा पत्ताच नसल्याने केवळ राष्ट्रगीत घेवून शाळेला सुट्ट्या देण्यात आल्याचे अनेक प्रकार संगमनेर तालुक्यात पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *