जागतिक महिला दिनी संगमनेरच्या लेडी सिंघमचा धमाका! दरोड्याच्या तयारीतील टोळीच पकडली; चौघांना अटक, एकजण पसार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोर्‍या, घरफोड्या, दरोडे यासारख्या सातत्यपूर्ण घटनांनी हादरलेल्या संगमनेरकरांसाठी अतिशय दिलासादायक वृत्त समोर आले आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारताच शहर पोलिसांच्या कार्यशैलीत आमुलाग्र बदल केल्याने त्याचा परिपाक आज पहाटे पहायला मिळाला. शहर पोलीस ठाण्याच्या लेडी सिंघम फराहनाज पटेल रात्रीची गस्त घालीत असताना संशयावरुन थांबवलेल्या वाहनात त्यांना चक्क पाच दरोडेखोर आढळून आले. मात्र पुढील कारवाई करण्यापूर्वीच त्यातील एकजण शेताच्या दिशेने पसार झाला. पोलिसांच्या या धाडसी कारवाईत पुणे जिल्ह्यातून दरोडा घालण्यासाठी संगमनेरात दाखल झालेली चार जणांची टोळी मात्र पोलिसांनी चतुर्भूज केली असून त्यांच्या ताब्यातून वेगवेगळी हत्यारे आणि साहित्यासह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनीच एका महिला पोलीस अधिकार्‍याने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे संगमनेरातून कौतुक होत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.10) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील रायतेवाडी फाट्याजवळ घडला. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल या आपले सहकारी चालक हेडकॉन्स्टेबल अजय आठरे, पो. ना. अण्णासाहेब दातीर, पो. कॉ. प्रमोद गाडेकर, अमृत आढाव, सुभाष बोडखे व होमगार्ड एम. थोरात यांच्यासह सरकारी वाहनातून महामार्गावर गस्त घालीत असताना पाठीमागील बाजूने कोरी नंबर प्लेट असलेल्या एका अलिशान स्वीफ्ट वाहनावर त्यांची नजर खिळली. या वाहनाचा वेग आणि क्रमांक नसल्यावरुन त्यांच्या मनात संशय निर्माण झाला.

उपनिरीक्षक पटेल यांनी चालक आठरे यांना सदरच्या वाहनाचा पाठलाग करुन त्याच्या पुढे जाण्याची सूचना करताच पोलिसांच्या वाहनाने काही अंतरावरच ‘त्या’ संशयित वाहनाला ओलांडले व थांबण्याचा इशारा केला. त्यावर वाहनचालकाने आपले वाहन थांबवत रस्त्याच्या बाजूला घेतले व पोलिसांना काही कळायच्या आतच त्यातील एकजण वाहनातून उतरुन शेताच्या दिशेने सुसाट वेगाने पळून गेला. हा प्रकार पाहून पोलिसांनी वाहनातील व्यक्ती सामान्य नसल्याचे ताडले आणि त्यांनी लागलीच ‘त्या’ वाहनाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाहनातील उर्वरीत चौघेही पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांच्या वाहनाला घेरल्याने ते जेरबंद झाले.

त्यांना खाली उतरवून पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता पोलिसांचा संशय वास्तवात उतरला. यावेळी पोलिसांना गाडीच्या पाठीमागील बाजूच्या शीटवर सुमारे 20 फूट लांबीची नायलॉन दोरी, एका बाजूला तीक्ष्ण टोक आणि दुसर्‍या बाजूला वर्तुळाकार वाकवलेले गज, करवत, कटावणी अशी दरोडा घालण्यासाठी विविध हत्यारे आणि अवजार आढळून आले. त्यावरुन ताब्यात घेतलेले चौघेही सामान्य नागरिक नव्हेतर दरोडेखोरच असल्याची पोलिसांनी पूर्ण खात्री झाली. यावेळी उपनिरीक्षक पटेल यांनी हाती लागलेले दरोडेखोरांचे स्वीफ्ट वाहन (एम.एच.02/सी.डी.8148) अन्य कर्मचार्‍याला पोलीस ठाण्यात घेवून जाण्यास सांगत त्या चौघांनाही सरकारी वाहनात घालून शहर पोलीस ठाण्यात आणले.

त्यांच्याकडे ओळख विचारली असता त्यांनी आपले नाव महेंद्र लक्ष्मण मधे (वय 25, रा.अभंगवस्ती, नारायणगाव, ता.जुन्नर), अविनाश चंद्रकांत जाधव (वय 26) व प्रवीण चंद्रकांत जाधव (वय 24, दोघेही रा.शिरोली (बोरी), डावखर मळा, ता.जुन्नर) आणि रोहन रामदास गिर्‍हे (वय 20, मूळ शिंदोडी, ता.संगमनेर, हल्ली मु.खोडद, ता.जुन्नर) असल्याचे सांगितले तर घटनास्थळावरुन पसार झालेल्या पाचव्या आरोपीची ओळख सोन्या (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी सांगितली. पो. कॉ. प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्या चौघांनाही दरोड्याच्या तयारीत वावरत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

एकीकडे जागतिक महिला दिनी जगभरातील कर्तृत्त्ववान महिलांच्या नावाचे स्मरण करुन नारीतील नारायणीचे दर्शन घडवले जात असतांना दुसरीकडे पहाटे दोन वाजता निडरपणे कर्तव्य बजावण्यासाठी महामार्गावर गस्त घालणार्‍या महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी अत्यंत धाडसाने आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसह शहरात गुन्हा करण्याच्या हेतूने वावरणार्‍या चार दरोडेखोरांची टोळी पकडून रुपेरी पडद्या पलिकडील ‘लेडी सिंघम’चे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या जिगरबाज कारवाईचे शहरातून कौतुकही होत आहे.

गेल्या काही महिन्यांत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारी घटना, चोरी व दरोड्याची श्रृंखला यामुळे नागरिक भयभीत झाले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील नागरिकांच्या मनातील हेच भय हटवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यासाठी त्यांनी पोलिसांच्या पारंपरिक कार्यपद्धतीत आमुलाग्र बदलही घडवले. त्याचाच परिपाक आज पहाटे पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईतून दिसून आले. या कारवाईने पोलिसांचे मनोबल उंचावण्यास मोठी मदत झाली असून त्याचे सकारात्मक परिणाम येणार्‍या कालावधीत समोर येतील अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *