विद्यार्थीनीचा पाठलाग करणार्‍यास सहा महिन्यांचा कारावास! संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाचा निकाल; विनयभंगासह पोक्सोतंर्गत शिक्षा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविद्यालयात शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा दररोज पाठलाग करीत तिची छेड काढणार्‍या व त्याच दरम्यान तिच्या मोपेडला आपली दुचाकी आडवी घालून तिचा विनयभंग करणार्‍या आरोपीला सहा महिन्यांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे. 2016 साली घडलेल्या या घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालले. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांनी नोंदविलेला जवाब ग्राह्य धरुन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपी मुदस्सर जाफर शेख याला सहा महिन्यांचा सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला, दंड न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.


याबाबतची हकिकत अशी की, शहरातील एक अल्पवयीन विद्यार्थीनी दररोज महाविद्यालयात जात असतांना अचानक नोव्हेंबर 2016 मध्ये आरोपी मुदस्सर जाफर शेख हा तिच्या वाहनाचा पाठलाग करु लागला. सुरुवातीला या प्रकाराकडे त्या मुलीने दुर्लक्ष केल्याने आरोपीचे मनोबल वाढले. त्यामुळे तो तिच्या घराच्या परिसरातही हेलपाटे मारु लागला. त्यामुळे सदर विद्यार्थीनीने याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीला समजावूनही सांगितले, मात्र त्याचा आरोपीवर कोणताही परिणाम झाला नाही.


यासर्व प्रकारानंतरही आरोपीने सदरील विद्यार्थीनीचा पाठलाग सुरुच ठेवला. त्यातच 4 नोव्हेंबर 2016 रोजी पीडित विद्यार्थीनी शिकवणी संपवून आपल्या मोपेडवरुन घराकडे जात असतांना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी मुदस्सर शेख याने दुचाकीवरुन येत तिच्या वाहनाला रोखले व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. रोजच्या या प्रकाराला वैतागलेल्या त्या विद्यार्थीनीने त्याला कायमचा धडा शिकवण्यासाठी त्याच दिवशी आपल्या वडिलांसह शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.


त्यानुसार शहर पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगासह पोक्सोतील तरतूदींनुसार गुन्हा दाखल करुन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर चालले. घटनेच्या अनुषंगाने सरकारी पक्षाने न्यायालयासमोर तीन साक्षीदारांचे जवाब नोंदविले. सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी जोरदार युक्तिवाद करीत आरोपीकडून पीडितेला असलेला धोका न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करुन सादर केलेले पुरावे, साक्षीदारांनी कथन केलेला प्रसंग आणि सरकारी वकिलांचा प्रबळ युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.


त्यानुसार न्यायालयाने आरोपी मुदस्सर जाफर शेख याला विनयभंग व पोक्सोतील तरतूदींच्या आधारे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 20 हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरीक्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांना पोलीस उपनिरीक्षक विजय परदेशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, आर.व्ही.भुतांबरे, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी व पी.बी.थोरात यांनी पैरवी अधिकारी म्हणून साहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *