मोपेडच्या डिकीतील सव्वादोन लाखांची रक्कम लंपास! घुलेवाडीच्या यूनियन बँकेसमोरील घटना; अज्ञात दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीच्या कर्मचार्‍याने व्यापार्‍यांना देण्यासाठी सोबत घेतलेल्या रकमेतील निम्मी रक्कम चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. जागतिक महिला दिनी घुलेवाडीतील यूनियन बँकेसमोर घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी अवघ्या काही क्षणातच मोपेडची डिकी उघडून त्यातील 2 लाख 13 हजार रुपयांची रोकड घेवून पोबारा केला. सदरची घटना समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी नाकाबंदी करीत चोरट्यांचा माग काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.8) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घुलेवाडीतील यूनियन बँकेसमोर घडली. संगमनेर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीतील कर्मचारी शरद रमेश गुजराथी (वय 32, रा.शिवाजीनगर) हे सुमारे सव्वापाच लाखांची रक्कम घेवून ती समनापूर येथील एका स्टील व्यापार्‍यास देण्यासाठी गेले होते. त्यानुसार सोबत घेतलेल्या एकूण रकमेतील तीन लाख रुपये त्यांनी तेथील व्यापार्‍यास अदा केले व व राहीलेली 2 लाख 13 हजारांची रक्कम आपल्या मोपेडच्या (क्र.एम.एच.17/बी.यू.8755) डिकीत ठेवून ते समनापूर-घुलेवाडी रस्त्याने घुलेवाडीतील यूनियन बँकेत पोहोचले.

बँकेत काही क्षणांचे काम असल्याने आपली मोपेड बँकेच्या अगदी दारात उभी करुन ते आत गेले. मात्र बँकेत त्यावेळी अन्य ग्राहकांची काहीशी वर्दळ असल्याने काही मिनिटांचा वेळ गेल्यावर त्यांना डिकीत ठेवलेल्या पैशांची चिंता वाटल्याने त्यांनी बाहेर येवून मोपेडची डिकी तपासली असता त्यातून वरीलप्रमाणे रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आसपास चौकशी करता सदरचा प्रकार घडताना पाहणारा कोणी भेटला नाही, मात्र या दरम्यान दोघेजण दुचाकीवरुन सुसाट वेगाने गेल्याची माहिती मात्र संबंधिताला मिळाला. त्यावरुन आपल्याकडील कंपनीचे पैसे अज्ञात दोघांनी चोरल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत शहर पोलिसांना कळविले.

याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी फौजफाट्यासह घुलेवाडीत जावून प्रकरणाची माहिती घेत तत्काळ शहरात नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच दोघेही चोरटे सुसाट वेगाने गायब झाले होते. या प्रकरणी शरद गुजराथी यांनी सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याकडे सोपविला आहे.

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या किंवा नागरिकांनी बँका, पतसंस्थांमधून काढलेली रक्कम त्यांच्याकडून ओरबाडून नेण्याच्या घटना संगमनेर शहराला नवीन नाहीत. अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र गेल्या काही कालावधीत पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, दळणवळणाच्या रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती यामुळे या घटनांना बराच पायबंदही बसला होता. बुधवारी घडलेली घटना घुलेवाडी शिवारात घडली, विशेष म्हणजे या घटनेबाबत पोलिसांना अद्यापही सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झालेले नाही. यावरुन चोरट्यांनीही सुरक्षीत ठिकाणांची निवड करुन आपला कार्यभाग उरकल्याचे दिसून आले आहे. या घटनेच्या माध्यमातून चोरट्यांनी नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनाही सलामी देत पोलिसांसमोर आपलेही आव्हान असल्याचा अप्रत्यक्ष संदेशच त्यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *