अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास वीस वर्षे सक्तमजुरी राहुरी तालुक्यातील घटना; विशेष पोक्सो न्यायालयाने सुनावली शिक्षा


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील ब्राह्मणी येथील शिवाजी भाऊराव सूर्यवंशी (वय 37) याने 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तसेच आत्महत्या करण्याची धमकी देऊन पळून नेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता. याप्रकरणी अहमदनगर येथील अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी त्याला दोषी धरत 20 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

या घटनेची थोडक्यात हकीगत अशी, 16 नोव्हेंबर 2021 च्या रात्री पीडित मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून घेऊन गेल्याची फिर्यादी तिच्या काकाने राहुरी पोलिसांत दिली होती. सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा नोंदविला. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच सहायक फौजदार सी. एन. बर्‍हाटे यांनी केला. तपासाच्या दरम्यान पीडित मुलगी मिळून आली. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, तीने सांगितले की ती शिवाजी सूर्यवंशी याला 2019 पासून ओळखत होती. शिवाजीचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले आहेत.

पीडित मुलगी ही शेतात काम करत असताना तसेच इतर वेळेस कोणीही नसताना शिवाजी हा तिच्या जवळ येत असे व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. तसेच शिवाजीने पीडित मुलीस बळजबरीने मोबाइल देऊन तिच्याशी बोलत असे. त्यानंतर शिवाजीने पीडित मुलीला धमकी दिली की, जर तू माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेल व तुझे व तुझ्या आई-वडिलांचे नाव चिठ्ठीमध्ये लिहून ठेवेन. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून गेली व ती शिवाजीशी बोलू लागली. 15 नोव्हेंबर, 2021 रोजी शिवाजीने तिला घराच्या बाहेर भेटायला बोलावले व आपण दोघे पळून जाऊन लग्न करू असे म्हणाला. त्यावेळी पीडित मुलगी नाही म्हणाली असता शिवाजीने तिच्या आईवडिलांना जहवे मारण्याची धमकी दिली व स्वतः विष पिऊन आत्महत्या करेल असे म्हणाला. त्यानंतर 17 नोव्हेंबर, 2021 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास शिवाजीने दिलेल्या धमकीमुळे पीडित मुलगी घाबरून जाऊन शिवाजीसोबत दुचाकीवर करमाळा (जि. सोलापूर) येथे गेली.

करमाळा येथे एका शेतामधील कोपीमध्ये शिवाजीने पीडित मुलीला ठेवले. 17 नोव्हेंबर, 2021 ते 12 डिसेंबर 2021 पावेतो पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. याबाबतचा जबाब पीडित मुलीने राहुरी पोलिसांसमोर दिला, घटनेचा तपास पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी केलेला युक्तीवाद व पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने महिला दिनाच्या दिवशी 20 वर्षे शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याच्या कामकाजात पैरवी अधिकारी आडसूळ, अंमलदार पठारे व वाघ यांनी सहकार्य केले.

पीडित मुलगी ही 14 वर्षे वयाची होती. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे ती पूर्णपणे घाबरून गेलेली होती. आरोपी विवाहित असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. वास्तविक पाहता, आरोपीचे लग्न झाले असल्याने पीडित मुलीला पळवून घेऊन जाणे यामागे आरोपीचा पीडित मुलीचा लैंगिक शोषण करणे हा एकमेव उद्देश होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत, असा युक्तीवाद सरकारी वकील केळगंद्रे यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *