अवकाळीने वाहिली चक्क होळीतून अग्नीधारा! सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार; होळीचा रंगही झाला बेरंग..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभरात सोमवारी होळीच्या सणाचा उत्साह दिसून आला. महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने होळीच्या पारंपरिक उत्साहावर पाणी फेरले गेले. संगमनेर शहरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास होळ्या पेटल्यानंतर काही वेळातच सुरु झालेल्या वादळाने होळ्यांमधील ठिणग्या हवेत मिसळून वाहू लागल्याने व त्यातच या कालावधीत वीजही गायब झाल्याने रस्त्यावरुन जणू अग्नीधारा वाहत असल्याचे विहंगम दृष्यही अनुभवायला मिळाले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह सुरु झालेला पाऊस रात्रभर आणि आज सकाळीही सुरुच राहिल्याने आजच्या धूलिवंदनाच्या रंगाचाही बेरंग झाला.

हवामानाचे भाष्यकार पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेल्या पूर्वानुमानानुसार सोमवारी (ता.6) सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यानुसार घडलेही तसेच. संध्याकाळी सात वाजल्यानंतर शहराच्या विविध भागात पारंपरिक पद्धतीने होळ्या पेटण्यास सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण तालुक्यावर ढगांची चादर अंथरलेली होती तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही सुरु झाला होता. पावसाच्या शक्यतेने अनेक भागात लोकांनी सात ते आठच्या दरम्यान होळ्या पेटवून नेवैद्यही दाखवला आणि बोलताबोलता अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला.

संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक होळ्या करण्याची परंपरा आहे. त्यानुसार चौकाचौकात आणि गल्लोगल्ली अशा प्रकारच्या होळ्या पेटवण्यात आल्या होत्या. सायंकाळी सुरु झालेल्या वादळानंतर काही वेळातच विद्युत प्रवाहही खंडीत झाला. एकीकडे विजांचा गडगडाट आणि दुसरीकडे तुफान वारे यामुळे छोट्या-छोट्या खासगी होळ्या काही वेळातच विझल्या, मात्र या वार्‍याने गोवर्‍यांचे थर उभारुन पेटवलेल्या सार्वजनिक होळ्यांची अवस्था अग्नीवाहक प्रवाहासारखी करुन सोडली.

या वादळाने अकोले नाक्यावरील वेडूमाता मंदिर, माळीवाड्यातील मारुती मंदिर, पालिकेसमोरील लाल बहादूरशास्त्री चौक, कटारिया कॉर्नर, गुजरी बाजार, अरगडे गल्ली, मालदाड रोड, इंदिरानगर, जनतानगर, गणेशनगर अशा बहुतेक ठिकाणच्या सार्वजनिक होळ्यांमधून ज्वाळांच्या ठिणग्यांचे लोळच्या लोळ उसळू लागल्याने आणि हवेच्या दिशेने जमिनीवरुन दूरवर वाहू लागल्याने पेटलेल्या होळ्यांमधून जणू अग्नीधाराच वाहत असल्याचे विहंगम दृष्य संगमनेरात पाहायला मिळाले.

सुदैवाने यावेळी बहुतेक रस्ते निर्मनुष्य झालेले होते, बाजारपेठा बंद होत्या व त्यातच वार्‍यासोबतच रिमझिम पाऊसही सुरु झाला होता. त्यामुळे आगीचे हे लोळ कोणतेही नुकसान करणारे ठरले नाहीत. काहींनी रस्त्यावरुन वाहणार्‍या अग्नीप्रवाहाला आपल्या मोबाईलमध्येही कैद केले व नंतर समाज माध्यमात त्याचे चित्रण शेअर केल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचेही बघायला मिळाले. त्यानंतर सुरु झालेला पाऊस रात्रभर सुरुच होता. त्यामुळे बर्‍याच मोठ्या कालावधीनंतर हिंदू धर्मियांमध्ये अतिशय उत्साहाने साजर्‍या होणार्‍या आणि पेटवल्यानंतर पाच ते सात दिवसांपर्यंत अखंड सुरु राहणार्‍या होळीच्या ज्वाळा पेटल्यानंतर काही वेळातच शमल्याचेही चित्र बघायला मिळाले.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात होळीच्या दुसर्‍या दिवशी धूलिवंदनाच्या दिनी रंग खेळण्याची प्रथा आहे. मात्र सोमवारी सायंकाळपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर आणि अनेक भागात आज सकाळपासून पुन्हा सुरु झाल्याने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून यावर्षीच्या होळीचा रंग अवकाळी पावसाने बेरंग केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *