जोर्वेत आल्यावर अंगात काहीतरी संचारल्याचा आभास ः विखे विखे पती-पत्नीची थोरातांवर टीका; सोळा कोटींच्या विकासकामांचाही केला शुभारंभ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाच वर्षांपूर्वी आपण जेव्हा जोर्वे गावात आलो होतो, तेव्हा येथील कार्यकर्त्यांनी ‘विकासाचा धिंगाणा’ अशा आशयाचे फ्लेक्स लावून माझे स्वागत केले होते. तेव्हापासून या परिसराचा कायापालट करण्यासाठी विविध विकासकामांचा धिंगाणाच सुरु आहे याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. जोर्वे गावात आल्यानंतर आपणास नवी ऊर्जा मिळते, अंगात काहीतरी संचारल्याचाही आभास होतो. या गावात राहणार्‍या नेत्याने राज्याचे नेतृत्त्व केले, पण त्यांना या गावाला पाणी देण्याची आठवण राहिली नाही. जोर्वेला पाणी देण्याचे भाग्य आपणास मिळाल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जोर्वे गावात रविवारी (ता.5) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विखे दाम्पत्याची गावातून मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत सोळा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जोर्वे येथील भाजपा कार्यकर्त्यांकडून विखे दाम्पत्याचा जाहीर सत्कारही करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित सभेत दोघांनीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना शालिनी विखे यांनी शिक्षण खात्याचे काम करताना विखे पाटलांनी आदर्श निर्माण केल्याचे सांगत तसेच काम महसूल विभागाच्या माध्यमातूनही सुरु असल्याचे सांगितले. यापूर्वी आपण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाषणाच्यावेळी टाळ्या वाजवल्या म्हणून आपल्यावर काहींनी टीका केल्याचे त्या म्हणाल्या. मात्र तुम्हीही चांगले काम केले तर तुमच्यासाठीही तशाच टाळ्या वाजवू असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला. महिला म्हणून हातात बांगड्या भरल्या असल्या तरीही भ्रष्टाचाराबाबत मात्र आपण गप्प बसणार्‍यांमध्ये नसल्याचे सांगताना त्यांनी जिल्हा परिषदेत कार्यरत असताना संगमनेर तालुक्यातील सदस्य आपल्यावर दबाव असल्याचे वारंवार सांगायचे अशी टीकाही त्यांनी केली.

मंत्री विखे यांनी आपल्या भाषणात संगमनेर तालुक्यातील विविध भागात आपण 861 कोटी रुपयांची विकासकामे सुरु केल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री थोरातांचे नाव न घेता त्यांनी उद्या हेच लोकं आपणच या योजना तालुक्यात आणल्याचे फ्लेक्सही लावतील असा टोलाही लगावताना सध्या तालुक्यातील वाळूवाले, क्रशरवाले यांना सोबत घेवून त्यांचे मोर्चे निघत असल्याची टीकाही मंत्री विखे यांनी केली. प्रवरा नदीपात्रातून होणारी बेसुमार वाळूतस्करी बंद केल्याने साक्षात प्रवरामाई आपणास प्रसन्न झाल्याची कोपरखळीही त्यांनी लगावली.

देशात भाजपाच्या विजयाचा अश्वमेध सुरु असून एखाद्या निवडणुकीत पराभव झाला की विरोधकांना हायसे हात असल्याचेही ते म्हणाले. केवळ सत्तेसाठी राज्यात तीन पक्षांनी मोट बांधली. ज्यांना आपले चाळीस आमदार सांभाळता आले नाहीत ते राज्याचा कारभार कसा करणार? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विचारला. देशाची हवा आता बदलत आहे या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतांना त्यांनी राष्ट्रवादी पक्षावरही आसूड ओढले. या पक्षाचा जन्मच फुटीरतेतून झाला असल्याचे सांगत ज्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता भोगली ते आज राजकीय भविष्य सांगत असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली. संजय राऊत आणि पहाटे आरवणारा कोंबडा दोघांत खूप साम्य असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नागरिकांना सर्वात स्वस्त वाळू देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगताना त्यांनी यापुढे राज्यात वाळू लिलाव होणार नसल्याचे जाहीर केले. वाळूच्या पैशांतून राजकारण आता पुरे झाले असे म्हणत येत्या पंधरा दिवसांत आदर्श वाळू धोरण जाहीर केले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ईडी ही एक स्वतंत्र व्यवस्था असून त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. ज्यांनी जनतेला फसवून कोट्यवधीची लुट केली त्यांनाच ईडीची भीती वाटते अशी पृष्टीही त्यांनी जोडली. एकट्या जोर्वे गावात वयोश्री योजनेसह कोट्यावधी रुपयांची विकासकामे आपण करीत असल्याचे सांगताना येथील नेतृत्त्वाने विकसित केलेले तालुक्यातील एखादे गाव दाखवण्याचे आव्हानही मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिले. या कार्यक्रमाला जोर्वेतील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *