कोपरगाव पालिकेमध्ये 57 लाख रुपयांचा वॉटर मीटर घोटाळा सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंची निवेदनातून कारवाईची मागणी


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिकेमध्ये तब्बल 57 लाख रुपयांचा वॉटर मीटर घोटाळा झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून या घोटाळ्यामागील सूत्रधारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदनातून केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव पालिकेने शहरामध्ये 2018 साली 42 कोटींहून अधिक रकमेची वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. नगरपालिकेच्या म्हणण्याप्रमाणे योजना पूर्ण झाल्यामुळे ठेकेदाराला संपूर्ण बिलाची रक्कम अदा करण्यात आली आहे. पाणी योजनेच्या कामामध्ये समावेश असलेले 10 हजार 3 (दहा हजार तीन) पाणी मोजणी संयंत्र (वॉटर मीटर) सदर ठेकेदाराने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बसवले आहे. किमान तशी नोंद पालिकेच्या मोजमाप नोंदवहीत करण्यात आली आहे. याबाबत काळे यांना माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहर वाढीव पाणी पुरवठा योजना देयक अदा करताना रुपये 57 लाख 71 हजार 199 (अक्षरी रुपये सत्तावन्न लाख एकाहत्तर हजार एकशे नव्व्यान्नव रुपये) इलेक्ट्रॉनिक फ्लो मीटर (विद्युत पाणी मोजणी यंत्र) यासाठी दिले असल्याची स्पष्ट नोंद आहे.

एकीकडे दहा हजार पाणी मीटर दिले असल्याची नोंद असताना ते कोणाला दिले असल्याची ग्राहक नोंद पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच वॉटर मीटरद्वारे घेण्यात आलेले रिडींग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. 57 लाख रुपयांच्या मालमत्तेचा तपशील पालिकेकडे नसणे म्हणजे विनोद नक्कीच नाही. 57.71 लाख रुपयांची मालमता कोणाला वाटली याची कोणतीही माहिती उपलब्ध नसणे म्हणजे ठेकेदार आणि तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी वॉटर मीटरच्या नावाखाली खोटे दस्तऐवज तयार करून 57.71 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. या प्रकरणात ठेकेदार, कन्सल्टन्ट सुपरवायझर, पाणी पुरवठा अभियंता यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *