एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण पाहिले नाही ः गडाख सोनई येथे कार्यकर्ता मेळावा; वीजचोरी प्रकरणावर केली भूमिका स्पष्ट


नायक वृत्तसेवा, नेवासा
कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, धीर देणे ही आपली भारतीय संस्कृती असताना तालुक्यातील विरोधकांनी त्याचे राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग चालविला आहे. आपण तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर राजकारण केले, असंख्य चढउतार पाहिले, परंतु एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण पाहिले नाही, अशी उद्विग्नता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.

नेवासा तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील वीज चोरी प्रकरणी या संघाचे अध्यक्ष व सध्या कोमात असलेले गडाख यांचे पुत्र प्रशांत यांच्यासह संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंबंधी कार्यकर्त्यांसमोर बोलताना गडाख यांनी ही खंत व्यक्त केली.

वीज कंपनीच्या भरारी पथकाने अलीकडेच ही कारवाई केली आहे. या दूध संघात सुमारे सव्वा कोटी रुपयांची वीज चोरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून संघ बंद आहे. मात्र, दहा वर्षांपूर्वी वीज चोरी झाल्याचे पथकाचे म्हणणे आहे. अध्यक्ष प्रशांत गडाख करोनाच्या काळात आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल केले, ते कोमात गेले असून अद्यापही बरे झालेले नाहीत. यासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासह भूमिका मांडण्यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनईत मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित राहून यशवंतराव गडाख यांनीही आपली भूमिका मांडली.

यशवंतराव गडाख म्हणाले, संकटं येतात तेव्हा नेत्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मन मोकळं केलं पाहिजे. प्रशांत गडाख कोमात असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. ते आजारी नसताना असा प्रकार केला असता तर त्यांनी तुमची भिंगरी केली असती. विरोधकांकडे सत्ता असतानाच्या काळात विविध संस्था उभारणीच्या माध्यमातून रचनात्मक कामे करायची सोडून हजारो लोकांचे प्रपंच अवलंबून असलेल्या चांगल्या चालू संस्था मोडकळीस आणण्यासाठी त्यांनी त्यांची राजकीय ताकद खर्च केल्याचा आरोप गडाख यांनी केला. द्वेषाधारित राजकारणातूनच महाभारत घडल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले. माजी मंत्री आमदार गडाख यावेळी बोलताना म्हणाले, तालुका दूध संघाच्या वीज मीटरची चावी महावितरण अधिकार्‍यांच्या ताब्यात असताना वेळोवेळी झालेल्या तपासणीत त्यांना वीज चोरी कधीही आढळली नाही. मात्र दहा वर्षांपूर्वीच्या कथित वीज चोरीचा दाखला देऊन पालघरच्या अधिकार्‍यांमार्फत अचानक दंड ठोठावून पोलिसांत गुन्हाही दाखल कसा झाला? याचे कोडे न उलगडण्याइतपत जनता खुळी राहिलेली नाही, असेही गडाख म्हणाले.

भावजय गौरी गडाख त्यानंतर प्रतीक काळे आकस्मित मृत्यू प्रकरणाबाबत आमदार गडाख यांनी यावेळी उपस्थितांसमोर भूमिका स्पष्ट करुन त्यांच्या मृत्यूचे भांडवल करुन आपल्या कुटुंबाला कसा मानसिक व कायदेशीर त्रास देण्यात आला, याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी मुळा शिक्षण संस्थेचे सोनईतील शैक्षणिक संकुल पाडण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अपक्ष आमदार असल्याने राजकीय सत्तांतराच्या काळात कुठेही जाऊन मंत्रीपद मिळवू शकत असताना केवळ तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान राखण्यासाठी तसे न केल्याचा खुलासा आमदार गडाख यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *