पिंप्री वळण येथे यात्रौत्सवात दोन गटांत तुफान हाणामारी राहुरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील पिंप्री वळण येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत दोन समाजाच्या गटात वाद निर्माण होऊन दगडफेक व हाणामारी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाल्याचेही समजते. राहुरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद निवळला व देवाच्या काठीची छबिना मिरवणूक शांततेत पार पडली.

राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथील ग्रामदैवत कानिफनाथ महाराजांचा गुरुवारी (ता.2) यात्रौत्सव सुरू होता. त्याचवेळी मुळानदी पुलावर काही तरुण बसलेले असता एका समाजातील गावातील व बाहेर गावावरून आलेल्या टोळक्याने पुलावर बसलेल्या तरुणांना वाद निर्माण करण्याच्या हेतूने शिवीगाळ सुरू केल्याने दोन्ही गटांत तुफान हाणामारी सुरू झाली. त्यानंतर एका गटाकडून दगडफेक झाल्याचेही समजते. या अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात सुरू असलेल्या यात्रौत्सवाच्या आनंदावर विरजन पडले.

या यात्रेत आलेल्या खाऊ, खेळणी तसेच इतर छोट्या व्यावसायिकांनी आपला गाशा गुंडाळून तेथून पळ काढला. या घटनेची राहुरी पोलिसांना माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. यावेळी शीघ्र कृती दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस निरीक्षक डांगे यांच्या हस्ते देवाची आरती होऊन देवाच्या काठीची छबिना मिरवणुकीची सांगता करण्यात आली. दरम्यान देवस्थान व देवस्थानाच्या जमिनीवरून दोन समाजात न्यायालयात वाद सुरू असल्याचे समजते. काहींना या यात्रौत्सवात मुद्दामहून वाद घालण्यासाठी बाहेरून माणसे बोलवले असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *