शिक्षकांना ‘बीएलओ’ची कामे देऊ नका ः पाडेकर शिक्षक भारती संघटनेचे अकोले तहसीलदारांना निवेदन


नायक वृत्तसेवा, अकोले
ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे की मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍याची (बी. एल. ओ.) कामे करायची याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना सकाळी प्रात्यक्षिके व दुपारी अध्यापन, माध्यमिक शिक्षकांना विविध शैक्षणिक कामे स्टुडंट पोर्टल, यू-डायस, परीक्षा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, आर. एस. पी. असे कितीतरी विभाग सांभाळून विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न करण्याचा प्रयत्न करत असताना अकोले तहसील कार्यालयाने शिक्षकांना बीएलओची कामे दिली आहेत. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना प्राध्यापकांना बीएलओची कामे देऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे शिक्षक भारती संघटना अहमदनगरचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले यांना दिले.

याप्रसंगी माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी आम्हांला न्याय मिळाला नाही तर आम्हांला देखील प्राथमिक शिक्षकांप्रमाणे न्यायालयात जावे लागेल असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष तयारीसाठी शिक्षकांना रविवारी देखील जादा तास घ्यावे लागतात असे उच्च माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संपत वाळके यांनी सांगितले. याप्रसंगी संपर्कप्रमुख सूरज गायकवाड, अमोल तळेकर, विजय पांडे, बाळू पवार, निशांत बिबवे, विनोद नवले, विजय उगले, पोपट सदगीर आदी उपस्थित होते. आमदार कपिल पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.

या मागणीला राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह जालिंदर सरोदे, कोकण विभागाचे अध्यक्ष धनाजी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर आदी पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *