पाथर्डी पोलिसांचा तपास अन् घारगाव पोलिसांची कारवाई! पाच दरोडेखोरांची टोळी जेरबंद; तीन जिल्ह्यातील अठरा गुन्ह्यांमध्ये सहभाग


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेली काही वर्ष केवळ घडणार्‍या घटनांची नोंद, ठप्प असलेले तपास आणि हप्तेखोरीने बरबटलेल्या घारगाव पोलीस ठाण्यातून काहीसे दिलासादायक वृत्त हाती आले आहे. चोर-पोलिसाच्या खेळात घारगाव पोलिसांची सरशी झाली असून अहमदनगरसह पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुडगूस घालणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद झाली आहे. या टोळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आठ तर त्यातील एका कुख्यात दरोडेखोरावर तीन जिल्ह्यात मिळून तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पाथर्डीत घरफोडी करुन गेल्या शनिवारी बोट्यात रस्तालुटीचा प्रकार घडवित चक्क घारगावमधील एका लॉजमध्ये झोपलेल्या अवस्थेत या पाचही जणांना पकडण्यात आले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असून त्याला नगरच्या बाल न्यायालयात तर उर्वरीत चार जणांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या कारवाईने घारगाव पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा उजाळण्यास मदत झाली आहे.

गेल्या शनिवारी (ता.25) मूळच्या नाशिकमधील वडाळा येथील रहिवाशी असलेले किशोर बाळकृष्ण राऊत (वय 37) हे आपल्या दुचाकीवरुन (क्र.एम.एच.15/सी.डब्ल्यू.3682) पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात असताना रात्री साडेदहाच्या सुमारास बोट्यानजीक पाठीमागून तीन मोटारसायकलवरुन आलेल्या सहा जणांनी त्यांना थांबवले. यावेळी त्या सर्वांनी ‘तू आमच्या अंगावर का थुंकलास?’ असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, यात त्यांच्या हाताचे हाडही मोडले. त्यानंतर या टोळीने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ऐवज व मोटारसायकल घेवून तेथून पोबारा केला.

या घटनेनंतर घाबरलेल्या राऊत यांना रस्त्यावरुन जाणारे प्रवाशी आणि परिसरातील काही नागरिकांनी घारगाव पोलीस ठाण्यात पोहोचवल्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करीत त्यांचा जवाब नोंदविला. त्यावरुन त्याच दिवशी (ता.25) पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी रविवारी (ता.26) या प्रकरणाच्या तपासाची दिशा चाचपडण्याचे काम सुरु असतानाच पाथर्डी पोलीस ठाण्यातून आलेला दूरध्वनी खणाणला आणि घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलिसांची धावपळ अचानक वाढल्याचे दिसू लागले.

पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, हवालदार के.एम.देशमुख, गणेश लोंढे, पोलीस नाईक संतोष खैरे, किशोर लाड, पोलीस शिपाई हरिश्चंद्र बांडे, अनिल भांगरे, महिला पोलीस वर्षा शिंदे आदिंनी लागलीच पाथर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी घारगावचे पोलीस पथक परिसरातील एका खासगी लॉजमध्ये आले व त्यांनी व्यवस्थापकास पूर्वकल्पना देत संपूर्ण इमारतीला वेढा घातला. पोलीस निरीक्षक खेडकर यांनी हातात पिस्तुल घेत दरोडेखोर आश्रयास असलेल्या खोलीचा दरवाजा वाजवला आणि आतील व्यक्तीने दरवाजा उघडताच सशस्त्र पोलिसांनी एकाचवेळी खोलीत घुसून पाचही दरोडेखोरांना जागीच जेरबंद केले.

या सर्वांना तेथून घारगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची ओळख पटवली असता त्यातील परशुराम अप्पा मोरे (वय 22, मूळ रा.मुरुड, ता.लातूर, हल्ली रा.रेणुकानगर, शेवगाव) याच्यावर शेवगाव पोलीस ठाण्यात दरोडा व फसवणुकीचे चार, पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी व दरोड्याचे चार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण पोलीस ठाण्यात दरोडा व पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यासह पुणे ग्रामीण हद्दीतील रांजणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा एक असे तीन जिल्ह्यात मिळून तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

तर त्याच्या टोळीतील सचिन दगडू कासार (वय 21, रा.निवडुंगे, ता.पाथर्डी), सलमान अहमद पठाण (वय 19, रा. मराठी शाळेजवळ, पाथर्डी), अनुराग मुकुंद असलकर (वय 20, रा.कसबा) व एका अल्पवयीन आरोपीने मिळून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता.25) घातलेल्या दरोड्यासह सुपा (ता.पारनेर) पोलिसांच्या हद्दीत शस्त्राचा धाक दाखवून केलेल्या चोरी व जबरी चोरीच्या तीन घटना, पाथर्डी, खेड, चाकण व शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, चोरी, जबरी चोरी व शस्त्रांचा वापर असे एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. या सर्वांना सोमवारी (ता.27) न्यायालयासमोर हजर केले असता त्यातील पहिल्या चार जणांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.3) पोलीस कोठडी सुनावली आहे, तर एका अल्पवयीन आरोपीला नगरच्या बाल न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील शहर, तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही प्रवाशांना रस्त्यात अडवून लुटण्याचे प्रकार घडले नव्हते, मात्र सुनील पाटील, मुकुंद देशमुख यांसारख्या केवळ तुंबड्या भरण्यात मश्गुल असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची येथील संपूर्ण कारकीर्द अतिशय निष्क्रिय ठरल्याने त्यांच्या कार्यकाळात नवनवीन गुन्हेगारी घटनांमध्येही मोठी वाढ झाली. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना पाथर्डी पोलिसांच्या तपासावर का असेना, पण घारगाव पोलिसांना प्रदीर्घ कालावधीनंतर आरोपी पकडण्यात यश आल्याने पठारभागातून समाधान व्यक्त होत आहे.


घारगाव पोलिसांनी पकडलेले पाचही दरोडेखोर अतिशय सराईत असून परशुराम मोरे या दरोडेखोराच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात आठ ठिकाणी चोरी, जबरी चोरी, दरोडे घातले असून त्यासाठी शस्त्रांचा वापर केला आहे. यातील अल्पवयीन असलेला आरोपी एका पोलीस कर्मचार्‍याचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत असून तो मोबाईलचा किडा असल्याचेही समजते. अटकेत असलेल्या चौघांवर 18 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असली तरीही त्यांच्या कोठडीतून आणखी काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *