पत्नीचा खून करणार्‍या पतीला दहा वर्षांचा सश्रम कारावास! संगमनेर जिल्हा न्यायालयाचा निकाल; अकोले तालुक्यातील मुरशेतची घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या पत्नीसह सासरवाडीत पोहोचलेल्या व यथेच्छ मद्यपानानंतर पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिला पुन्हा घरी घेवून जातांना रस्त्यातच तिचा काटा काढणार्‍या आणि नंतर अपघाताचा बनाव रचणार्‍या पतीला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या वर्षी जानेवारीत मुरशेत-त्रिंगलवाडी रस्त्यावरील परदेशवाडीत सदरची घटना घडली होती. याप्रकरणी मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरुन राजूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. वर्षभरातच या प्रकरणाचा निकाल लागला असून संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.एच.आमेटा यांनी या प्रकरणी मयत महिलेच्या पतीला दोषी धरले आहे.


याबाबतची हकिकत अशी की, त्र्यंबक रामदास गोंदके (रा.त्रिंगलवाडी, ता.इगतपूरी) यांची बहिण शोभा हिचे अकोले तालुक्यातील मुरशेत येथील संजय भरत बांगर याच्यासोबत लग्न झालेले आहे. गेल्यावर्षी 17 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दोघेही मोटार सायकलवरुन त्रिंगलवाडी येथे गेले होते. यावेळी संजय बांगर याचा मेव्हणा फिर्यादी त्र्यंबक गोंदके याने त्यांना यथेच्छ दारु पाजल्यानंतर त्या सगळ्यांनी सायंकाळी एकत्रित जेवण आटोपले.


त्यानंतर संजय बांगर आपल्या दुचाकीवरुन मुरशेतला परतण्याचा आग्रह करु लागला. मात्र त्याने मद्याचे अधिक सेवन केलेले असल्याने त्याच्या मेव्हण्याने त्याना त्रिंगलवाडीतच मुक्काम करण्याचा आग्रह केला. त्याच्या बहिणीचीही माहेरी रात्रभर थांबण्याची इच्छा होती व तिने ती बोलूनही दाखवली, त्याचा राग आल्याने बांगरने तिच्या भावासमोरच तिच्या श्रीमुखात मारली होती. त्यामुळे नंतर त्यांना कोणीही थांबण्याचा आग्रह न करता केवळ सावकाशपणे घरी जाण्याचा सल्ला देत निरोप दिला. त्याप्रमाणे रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान दोघे पती-पत्नी त्रिंगलवाडीहून मुरशेतकडे जाण्यास निघाले.


दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना मुरशेतहून फोन आला व शोभा चक्कर येवून गाडीवरुन पडली व मयत झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार मयत शोभा बांगरच्या माहेरील मंडळींनी मुरशेतला धाव घेत मयताचे शरीर पाहीले असता तिच्या शरीरावर मारहाणीचे वळ दिसून आले. त्यातून घातपाताचा संशय निर्माण झाल्याने मयतेचा भाऊ त्र्यंबक गोंदके याने राजूर पोलीस ठाण्यात खून केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही खुनाचा गुन्हा दाखल केला व राजूरचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे व उपनिरीक्षक खैरनार यांनी तपास पूर्ण करुन आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यालयात दोषारोप पत्र दाखल केले.


या प्रकरणाचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.एच.आमेटा यांच्यासमोर चालले. सदर प्रकरणात सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने एकूण नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांनी न्यायालयासमोर नोंदविलेले जवाब व वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी संजय भरत बांगर याला दोषी धरुन 10 वर्षांच्या सश्रम कारावासासह 20 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे कामकाज सरकारी वकिल भानुदास कोल्हे यांनी पाहिले, त्यांना अ‍ॅड.गवते, अ‍ॅड.दिवटे यांनी साहाय्य केले. पो.कॉ.स्वाती नाईकवाडी यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *