स्वातंत्र्यवीर म्हटले की डोळ्यापुढे फक्त सावरकरच येतात ः शाहीर जोशी ‘नमन वीरतेला’ शाहिरी कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीरांना केले अभिवादन


वैशाली कुलकर्णी, संगमनेर
स्वातंत्र्यवीर म्हटले की डोळ्यापुढे फक्त सावरकरच उभे राहतात. जनतेनेच ही पदवी सावरकरांना बहाल केली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील एकमेव महिला शाहीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात विनता जोशी यांनी केले. निमित्त होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आयोजित नमन वीरतेला या शाहिरी कार्यक्रमाचे.

संगमनेरातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी, पुरोहित संघ आणि ब्राह्मण प्रतिष्ठान तर्फे या जोशपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पतसंस्थेचे अध्यक्ष पराग सराफ होते. व्यासपीठावर शोभा ठाकूर, दीपा पुरोहित, हेमा रेणके, दीपाली उपासनी, मीनल जोशी, वैशाली कुलकर्णी, संदीप वैद्य, अनिरुद्ध उपासनी आदी उपस्थित होते.

प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावरकरांचा धगधगता जीवनपट विनता जोशी यांनी आपल्या पहाडी आवाजात पोवड्याच्या माध्यमातून उलगडवत श्रोतावर्गाला खिळवून ठेवले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाही पोवाडा यावेळी सादर झाला. त्यांच्या आयुष्यातील लढाईचा शेवटचा प्रसंग श्रोत्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेला. यावेळी तबल्यावर राजकुमार संस्कर यांची सुरेख साथ होती. संगमनेरकर सावरकरप्रेमींना या श्रवणीय आणि वीरश्रीयुक्त कार्यक्रमाची पर्वणी लाभली.

सूत्रसंचालन सायली संभुस आणि अमृता सराफ यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्ना संत, गीता सराफ, सुप्रिया मंडलिक, भाग्यश्री बेलापूरकर, प्राची मुळे, अनन्या टोकेकर, पुरोहित संघाचे अध्यक्ष नरेंद्र जाखडी, अक्षय काळे, ब्राह्मण प्रतिष्ठानचे सौरभ म्हाळस, सर्वेश देशपांडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते एस. झेड. देशमुख, अशोक सराफ, ज्ञानेश्वर कर्पे यांसह संगमनेरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *