भारतात स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त ः डॉ. वाबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात इनरव्हील क्लबच्या सहकार्याने शिबिर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचं निदान होतं. तर दर आठ मिनिटाला एका महिलेचा त्यामुळे मृत्यू होतो. भारतात इतर कोणत्याही कर्करोगापेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण महिलांमध्ये वाढलं आहे. त्यामुळेच याबाबत वेळीच जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे, हे शिवधनुष्य शिक्षक पेलू शकतील असे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ व संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. एकता वाबळे यांनी केले.

संगमनेरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांमधील कर्करोग मोफत निदान व मार्गदर्शन शिबिरात डॉ. एकता वाबळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हीलच्या अध्यक्षा वृषाली कडलग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संध्या खेडेकर उपस्थित होत्या.

लवकर समजलेला कर्करोग हा बरा होऊ शकतो. ग्रामीण भागातील स्त्रिया कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. या परिस्थितीमध्ये बदल होण्याची गरज आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या भविष्यातील शिक्षिका आहेत, त्या ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जनजागृती करू शकतात असेही डॉ. वाबळे म्हणाल्या. कुटुंबातील पुरुषांनी प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाला नवरा-बायको दोघांचीही कर्करोगविषयक तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत भारतीय लोकांची जीवनशैली सुद्धा चंगळवादी झाली आहे. या जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणून व्यायाम व समतोल आहार या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. अस्वस्थ आहार घेतल्यामुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 20 टक्क्याने वाढतो असे संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. ब्रेस्टफीडिंग, नियमित व्यायाम, वजन नियंत्रित ठेवणं, मद्यपान टाळणं, तंबाखू न खाणं, हॉर्मोनचा अतिरिक्त वापर टाळणं आणि रेडिएशपासून दूर राहणं अशा काही उपायांमुळे तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करू शकता, असेही डॉ. वाबळे यांनी सांगितले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वृषाली कडलग यांनी इनरव्हील क्लबच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सुनील देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता परदेशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *