एक्टोपिक किडनीतून मुतखडा काढण्यात डॉक्टरांना आले यश! संगमनेरातील वाघोलीकर हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील वाघोलीकर किडनी हॉस्पिटलमध्ये एका 40 वर्षीय रुग्णाच्या एक्टोपिक किडनीतून मुतखडा काढण्यात सुप्रसिद्ध किडनीविकारतज्ज्ञ डॉ. हृषीकेश वाघोलीकर यांना यश आले आहे. यामुळे रुग्णालाही नवसंजीवनी मिळाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले.

अरुण तांबे या रुग्णाच्या दोन्ही किडन्या जन्मतःच शरीरातील एकाच बाजूला होत्या आणि एकमेकांना चिकटलेल्या होत्या. नियमितपणे उजवी किडनी ही मणक्याच्या उजव्या बाजूला अणि डावी किडनी मणक्याच्या डाव्या बाजूला असते. पण तांबे यांच्या दोन्ही किडन्या जन्मतःच मणक्याच्या डाव्या बाजूला वर खाली एकमेकांना चिकटून होत्या. त्यात खालच्या किडनीमध्ये 35 मिलीमीटरचा मोठा मुतखडा तयार झाला होता. अशा पद्धतीची किडनी रचना मुळातच खूप दुर्मिळ असते अणि त्यात भला मोठा मुतखडा झाल्याने रुग्ण त्रस्त झालेले होते. याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे फार आव्हानात्मक असते. वैद्यकीय जर्नल्समध्ये पण अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियांची नोंद दुर्मिळच आहे.

मात्र, सदर रुग्ण ही समस्या घेऊन डॉ. हृषीकेश वाघोलीकर यांना भेटले. तेव्हा पहिल्या भेटीतच आपण ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे संगमनेरमध्ये करू शकतो असे आश्वासन डॉक्टरांनी त्यांना दिले. सखोल सर्जिकल प्लॅनिंग करण्यासाठी रुग्णाच्या पोटाचा सिटी स्कॅन करण्यात आला. रुग्णाची उजवी किडनी पोटाच्या डाव्या बाजूला असली तरी तिचे ओरिएंटेशन हे उजव्या किडनी सारखेच होते अणि ती नेहमीपेक्षा पोटाच्या खालच्या बाजूला होती. अशा क्लिष्ट रचनेमुळे दुर्बिणीद्वारे किडनीमध्ये शिरकाव करण्यासाठी खूपच मर्यादित पर्याय होते. किडनीमध्ये शिरल्यानंतरही किडनीच्या प्रत्येक कोपर्‍यात दुर्बिणीद्वारे पोहोचणे कठीण होते. पण हे आव्हान स्वीकारत डॉ. वाघोलीकर यांनी ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे लीलया पार पाडली. संपूर्ण शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे केली गेली अणि विशेष म्हणजे रुग्णाला दोनच दिवसांत यशस्वीरित्या डिस्चार्ज करण्यात आले. याबद्दल रुग्णासह नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले. अशा पद्धतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आता संगमनेरमध्ये होऊ लागल्याने आजूबाजूच्या तालुक्यांतील रुग्णांचा ओघ पुणे-नाशिकपेक्षा संगमनेर कडे जास्त होत चालल्याचेच यातून दिसून येत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *