तालुक्यातील सव्वालाख बालकांची होणार सुदृढ तपासणी! आरोग्य विभागाचा उपक्रम; तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांचाही समावेश


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बालकांचे कुपोषण टाळावे यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या ‘जागरुक पालक-सुदृढ बालक’ या महत्त्वकांक्षी उपक्रमाचा संगमनेरात शुभारंभ झाला. या अभियानातंर्गत तालुका आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यातील 0 ते 18 वयोगटाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या तपासणीतून मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या घटकांची कमतरता, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकेतुनसार उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या अभियानातंर्गत तालुक्यातील जवळपास अकराशे शाळा व अंगणवाड्यांमधील 1 लाख 18 हजार मुलांची 69 पथकांद्वारा तपासणी होणार असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली.

वातावरणीय बदलाचा लहान मुलांच्या शरीरावर परिणाम होत असतो. अशावेळी झालेल्या एखाद्या आजारावर घरगुती उपचार करुन तो बराही केला जातो. मात्र फारशी लक्षणे नसलेली किंवा घरगुती उपचाराने तात्पुरत्या बर्‍या झालेल्या काही आजारांचा मुलांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होण्याचा धोका असतो. त्यातूनच कुपोषणासारखे प्रकार घडण्याचीही शक्यता असल्याने महाराष्ट्र सरकारने राज्यातील 0 ते 18 वयोगटातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचा शुभारंभ राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीने झाल्यानंतर त्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरु झाली आहे.

संगमनेर तालुका आरोग्य विभागाने यानिमित्ताने ‘महाआरोग्य शिबिर’ही आयोजित केले होते. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी व साकूर येथील ग्रामीण रुग्णालये, ग्रामीण भागातील दहा आणि शहरी भागातील एक असे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी या शिबिरातंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येवून त्यांना औषधे दिली गेली. घुलेवाडी व साकूर येथील ग्रामीण रुग्णालयांसह घुलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

‘जागरुक पालक-सुदृढ बालक’ या अभियानातंर्गत तालुक्यातील 378 शासकीय, 75 अनुदानित, 45 खासगी, दोन दिव्यांग व 9 आश्रमशाळांमधील 82 हजार 11 मुलांसह 568 अंगणवाड्यांमधील शून्य ते अठरा वयोगटातील 35 हजार 754 अशा तालुक्यातील एकूण 1 लाख 17 हजार 765 मुलांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक बालकाची या माध्यमातून आरोग्य तपासणी व्हावी असे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले असून संगमनेरचा आरोग्य विभागही त्यासाठी कार्यरत झाला आहे. राज्य सरकारच्या या महत्वकांक्षी अभियानात आरोग्य मंत्रालयासह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण व समाज कल्याण विभाग अशा विविध मंत्रालयांचा सहभाग असून ही योजना शेवटच्या बालकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आणि प्रशासन जारेदार प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *