जन्मदात्याने अकराव्या दिवशीच घेतला मुलाचा जीव! पोखरी येथील धक्कादायक घटना; नांदूर खंदरमाळ येथील पित्यास अटक


नायक वृत्तसेवा, नगर
बाळ दिव्यांग आहे, पुढे त्यांचा सांभाळ करणे अवघड होईल, असे वाटून जन्मदात्या पित्यानेच जन्माच्या अकराव्या दिवशी मुलाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला आहे. पारनेर तालुक्यातील पोखरी येथे ही घटना घडली आहे. मुलाच्या आजीने याबाबत फिर्याद दिली असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील अक्षय रामदास सुपेकर (वय 32) याला अटक करण्यात आली आहे. सुपेकर याचा विवाह पोखरी येथील प्रियांका यांच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगी आहे. दुसर्‍या बाळंतपणासाठी त्याची पत्नी माहेरी आली होती. रुग्णालयात प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मात्र, मुलाचा एक कान लहान होता. त्यानंतर त्याला अर्धांगवायूसारखा झटका आल्याने तोंड थोडे वाकडे झाल्यासारखे आणि डोळा बारीक झाल्यासारखा दिसू लागला. ही गोष्ट आरोपी सुपेकर याला खटकत होती.

रुग्णालयात घरी पाठवल्यानंतर पत्नी प्रियांका माहेरी पोखरी येथे असाताना सुपेकर तेथे आला. त्यानंतर उपचार करण्यासाठी नेतो, असे सांगून तो बाळाला काही वेळासाठी बाहेर घेऊन आला. काही वेळात बाळासह परत आला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, आपले बाळ दिव्यांग होते, त्याचा पुढे आयुष्यभर सांभाळ करताना त्रास झाला असता. त्यामुळे मी त्याला गळा दाबून मारले आहे. हे ऐकून पत्नीने हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारचे लोकही जमले. मृत बाळ पाहून लोकांनी पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुपेकर याला ताब्यात घेतले. त्याची सासू मंदाबाई भास्कर पवार (वय 52, रा. पोखरी, ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपेकर याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

8 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी सुपेकर मोटारसायकलवर आला. जेवण केल्यावर साडेबारा वाजता मुलाला पत्नीकडून घेतले. फिरवून आणतो असे सांगून बाळाला सोबत घेऊन मोटरसायकल निघून गेला. त्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी पुन्हा बाळाला घेऊन घरी परत आला. पत्नी प्रियंकाला सांगितले की, आपले बाळ दिव्यांग असल्याने त्याचे भविष्य खूप वाईट आहे. त्याचा सांभाळ करणे पुढे भविष्यात कठीण होईल. यामुळे मी त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले. त्याचे हे बोलणे त्याची सासू मंदाबाई यांनी ऐकले. त्यांनी बाळाला पाहिले असता त्याचा श्वासोश्वास बंद पडलेल्याचे आढळून आले. त्याची हालचाल बंद पडल्याचे पाहून मायलेकींनी जोरात हंबरडा फोडला. त्यांचा आवाज ऐकून गल्लीतील लोक जमा झाले. त्यानंतर कोणीतरी पोलीसांना माहिती दिल्याने पोलीस घरी आले. त्यांनी बाळाची पाहणी करुन अक्षय सुपेकरला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व उपनिरीक्षक विजय ठाकूर हे अधिक तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *