ऐतिहासिक पेमगिरीमध्ये साकारणार भारतातील सर्वात मोठी गदा 21 फूट उंची; 6 एप्रिलला हनुमान जयंतीदिनी करणार अर्पण


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पेमगिरी हे संगमनेर तालुक्यात वैशिष्ट्यपूर्ण असे ऐतिहासिक गाव असून महाराष्ट्रातील महाकाय वटवृक्ष आहे. आता गावाच्या या वैशिष्ट्यात अधिक भर पडणार असून, भारतातील सर्वात मोठी 21 फूट उंचीची गदा साकारण्यात येणार आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडे डोंगरांच्या कुशीत अठरा किलोमीटरवर हे गाव आहे. पुरातन काळापासून या गावात बारा बलुतेदार व अठरापगड समाजाचे 4500 च्या आसपास लोक राहतात. सागवानी लाकूड वापरलेले स्वातंत्र्यपूर्व काळातील चार मजली भव्य मारुती मंदिर पुन्हा एकदा जीर्णोद्धारानंतर देवदर्शनासाठी पर्वणी ठरणार आहे. येथे प्रतिशनि मंदिर देखील आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘महावटवृक्ष’ पावणेतीन एकर परिसरात आहे. शिवरायांच्या जन्मानंतर स्वराज्याचे विचारबीज रोवण्यास शहाजीराजांनी निजामाचा लहान वंशज मुर्तझाला गादीवर बसवून वजीर होऊन 64 किल्ल्यांचा सलग चार वर्ष राज्य कारभार केला. सन 1707 सालापासून सुबक अशा बारवेतून डुबे परिवार गावाला पिण्याचे पाणी देत होते.


स्वातंत्र्य चळवळीतील आद्यपुरुष गंगाराम डुबे यांनी सुमारे 80 वर्षापूर्वी चार मजली संपूर्ण ‘सागवानी लाकडा’चे मारुती मंदिर गावकर्‍यांच्या सहकार्याने उभारले होते. त्यांचे पणतू उद्योजक रोहित डुबे यांनी गावकर्‍यांच्या एकजुटीने 2017 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मारुती मंदिर वास्तू कलेचा सुंदर नमुना आहे. याच मारुती मंदिर परिसरात 21 फूट उंचीची भारतातील सर्वात मोठी गदा जमिनीवर साकारली जाणार आहे. या गगनचुंबी वास्तूचे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ नक्कीच दखल घेतील अशी आशा गावचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे व राजाराम विश्वनाथ डुबे यांनी बोलून दाखवली. येत्या 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीदिनी मारुतीरायांना ही गदा अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती शांताराम डुबे यांनी दिली.

विविध सामाजिक चळवळीतून वृक्षसंवर्धन व जलसंधारणाद्वारे पीक नियोजनास गाव आघाडीवर आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य अर्चना वनपत्रे व सरपंच द्वारका डुबे यांनी दिली. लवकरच हनुमानजींच्या गदेचे अनावरण झाल्यावर मारुती मंदिरासोबतच ही उंच गदा पाहण्यास हनुमान भक्तांची मांदियाळी वाढेल अशी भावना माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब डुबे यांनी व्यक्त केली. या धर्मकार्यास स्वप्नील कोल्हे, शुभम वनपत्रे आणि दीपक डुबे या तरुणांची ग्रामस्थांना साथ लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *