विमानप्रवासाची गोष्ट पुस्तकाचे झाले इंग्रजीत भाषांतर 11 फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये होणार पुस्तकाचे प्रकाशन


नायक वृत्तसेवा, अकोले
इंग्रजीतून मराठीत अनेक पुस्तके अनुवादित होतात. परंतु मराठीतून इंग्रजीत अनुवादित होणारी पुस्तके दुर्मिळ असतात. प्रयोगशील शिक्षक, लेखक भाऊसाहेब कासार यांनी लिहिलेल्या विमानप्रवासाची गोष्ट या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर झाले असून त्याचे प्रकाशन शनिवारी (ता.11) बेंगलोरमध्ये होत आहे.

विप्रो फाउंडेशन व पर्यावरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या अर्थियन पुरस्कार वितरण समारंभात हे पुस्तक प्रकाशन होणार आहे. या समारंभासाठी विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी, अर्थियन कार्यक्रमाचे प्रमुख अनुराग बेहर उपस्थित असणार आहेत. कासारही या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत. अर्थियन कार्यक्रमासाठी यावर्षीचे देशभरातील विजेते विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित असणार आहेत. अर्थियन हा देशभरातील मुलांचा सन्मान व कौतुक सोहळा तर असतोच त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन यात केलेले असते. विमानप्रवासाची गोष्ट हे पुस्तक ‘अ फ्लाईट वेल डिझर्व्ह : बहिरवाडी टू बंगळुरू’ या नावाने इंग्रजी अनुवादित होत आहे. नाशिक येथील प्रयोगशील शिक्षिका लेखिका सरीता गोसावी यांनी मराठी पुस्तकाचा भाव इंग्रजीत उतरविला आहे.

शिक्षक कासार यांनी अक्षदा गोरडे, पूनम काळे, शांताराम पथवे, आदित्य कासार, प्रणव चासकर या सहावी – सातवीत शिकणार्‍या मुलांसह 2016 साली विप्रोकडे सादर केलेल्या जल व्यवस्थापन या प्रकल्पाला अर्थियन हा एक लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्वीकारणेसाठी त्यांना पुणे ते बेंगलोर असा विमान प्रवास घडला होता. मुलांसोबतच्या पहिल्या वहिल्या विमानप्रवासावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिले. या प्रवासातील गमती जमती पुस्तकात वाचायला मिळतात. मुलांच्या भावभावनांचे यथार्थ वर्णन त्यांनी टिपले आहे. एका वाडीतील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत पोहोचताना त्याचे वर्णन रोमांच उत्कंठा आणि उत्साहाने भरलेलं आहे. लेखकाने या प्रवासाचे वर्णन आपल्या अनोख्या शैलीत मांडले आहे. मुलांच्या लोकल ते ग्लोबल शिक्षणाची कहाणी या पुस्तकातून उलगडत जाते. प्रकाशन समारंभानंतर विजेते विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक सहभागी शाळा तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. यानिमित्ताने देशभरातील वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचणार आहे. अनुवादाची प्रक्रिया पूर्ण होताना विप्रो फाउंडेशनचे लिंगराज डिन्नी, आरती हनुमंतप्पा व अर्थियन टिमचे मोलाचे सहकार्य लाभले.

विमानप्रवासाची गोष्ट हे मराठी पुस्तक साध्या सोप्या भाषेत लालित्यपूर्ण शैलीत आहे. मूळ पुस्तकाचा गाभा इंग्रजीत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
– सरीता गोसावी-अनुवादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *