चासनळीच्या चांदगुडे कुटुंबियांनी आईचे मरणोत्तर केले देहदान आदरांजली सभेतही देहदानाची इच्छा असणार्‍यांचे अर्ज घेणार भरून


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अंधश्रद्धा निर्मूलनच्या माध्यमातून राज्यभरात जनजागृती करणारे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर त्यांनी देहदान केले. चांदगुडे कुटुंबियांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेतले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील भूमिपुत्र असलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे (वय 83) यांचे आजारपणामुळे नुकतेच निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांचे कोणतेही विधी करणार नसल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

सुगंधाबाई यांची आदरांजली सभा 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी देहदान व अवयवदान काळाची गरज या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते सुनील देशपांडे (उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणार्‍यांचे अर्ज भरून घेणार असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

पुरोगामी विचारांचा माझ्यावर पगडा आहे. चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सान्निध्यात राहिलो असल्याने, त्यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. आपल्या उक्ती व कृतीत अंतर नसावे हे जपण्यासाठी सदरचे कृतिशील पाऊल उचलले. चांदगुडे कुटुंबियांनी आत्तापर्यंत असे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत, त्याचे समाजातून स्वागत झाले आहे. या जनजागृतीत माध्यमांचे मोठे योगदान आहे. या माध्यमातून चळवळीचा प्रचार व प्रसार करू शकलो. पत्नीसह माझा देहदानाचा अर्ज भरलेला आहे.
– कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह-अंनिस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *