भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते संजय नाकिल यांचे निधन! कर्करोगाशी झुंज अपयशी; संजय गांधी योजनेचे केले होते प्रभावी काम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या भारतीय जनता पार्टीला आज मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते संजय चंद्रकांत नाकिल (वय 52) यांचे सकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुरु होते, मात्र त्यांची प्रदीर्घ झुंज आज संपुष्टात आली. गेली चार दशके पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी विविध जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या. संजय गांधी निराधार योजनेचे अतिशय प्रभावी काम करतांना त्यांनी हजारों निराधारांना त्याचा लाभ मिळवून दिला.

संगमनेरच्या भाजपामधील जुन्या फळीतील अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता अयी ओळख निर्माण करणारे संजय नाकिल गेल्या चार दशकांपासून पक्षकार्यात समर्पित होते. या प्रदीर्घ कालावधीत पक्षाने त्यांना सोपविलेल्या विविध जबाबदार्‍या पूर्ण करतांना त्यांनी कधीही कानकूस केली नाही. अतिशय मवाळ वाणी आणि नेहमी सकारात्मक विचार यामुळे स्थानिक भाजपामध्ये त्यांना ऊर्जामयी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात.

पक्षकार्यात व्यस्त असतांनाच त्यांना कर्करोगाने जखडले. मात्र त्यावरील उपचार घेताघेता ते आपल्यावरील जबाबदार्‍याही कधीही विसरले नाहीत. प्रदीर्घ कालावधीपासून त्यांच्यावर मुंबई, पुणे, नाशिक, प्रवरानगर व संगमनेर येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारही करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्तिच्या बळावर त्यातून ते सहीसलामत बरे होतील असे वाटत असतांनाच आज (ता.1) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही नाकिल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. संजय नाकिल यांच्या पश्‍चात प्राथमिक शिक्षक असलेली पत्नी, एक डॉक्टर व दुसरी फॅशन डिझायनर असलेल्या मुली, दोन भाऊ, बहिणी, पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *