खडकी येथील बंधार्‍यांवरील ढापे चोरणारी टोळी पकडली 12 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; राजूर पोलिसांची कामगिरी


नायक वृत्तसेवा, अकोले
सप्टेंबर 2022 मध्ये खडकी येथील बंधार्‍यावरुन 80 लोखंडी ढापे चोरीला गेले होते. याबाबत राजूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास करुन राजूर पोलिसांनी 12 लाख 14 हजार रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक केली आहे.

राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांना गुप्त बातमी मिळाली की, सहा महिन्यांपूर्वी खडकी व शिसवद येथील बंधार्‍यावरील ढापे राजाराम नारायण तातळे (वय 39, रा. तातळेवाडी, बिरगाव तराळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याने चोरले आहे. त्यावरुन त्यास चौकशी कामी ताब्यात घेतले असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक विश्वासात घेतले असता त्याने साथीदारच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने शंकर सावकार आढळ (वय 35, रा. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) व ज्ञानेश्वर अनाजी बगाड (वय 22, रा. निनावी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी दोन पिकअपसह एक ऑक्सिजन गॅसची टाकी, घरगुती वापराची गॅसची टाकी, गॅस कटर, लोखंडी कटर असा एकूण 12 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जी. एफ. शेख, पोहेकॉ. विजय मुंढे, कैलास नेहे, पोना. दिलीप डगळे, पटेकर, पोकॉ. संभाजी सांगळे, अशोक गाढे, विजय फटांगरे, सुनील ढाकणे, साईनाथ वर्पे, अशोक काळे, पोना. फुरकान शेख यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. विजय मुंढे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *