पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित : विखे संगमनेर तालुक्यात मतदारांचा उत्साह; जिल्ह्यातून मोठी आघाडी मिळण्याची शक्यता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या दोन तासांत हवेतील गारवा आणि मोठ्या प्रमाणात पसरलेले धुके यामुळे मतदानाची टक्केवारी जेमतेम होती. मात्र साडेनऊ वाजल्यानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या बाहेर पदवीधर व शिक्षकांच्या रांगा लागल्याचे बघायला मिळाले. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात 31.71 टक्के, जिल्ह्यात 32.55 टक्के तर संगमनेर तालुक्यात दुपारी चार वाजेपर्यंत 58.72 टक्के मतदान नोंदविले गेले आहे. राज्याचे महसूल मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही लोणीत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अन्य उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यातही अर्थ नसल्याचे सांगत सत्यजीत तांबे यांचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

लोणीतील होळकर विद्यालयाच्या मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांच्यासाठी काम केल्याचे सांगत त्यांचा विजय निश्चित असल्याने निवडणुकीतील अन्य उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यातही अर्थ उरला नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची परतफेड म्हणून सत्यजीत तांबे यांनी भाजपात प्रवेश केला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर ते योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. सुधीर तांबे तीनवेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्तात काँग्रेस शिल्लक असेल याबाबत शंका नाही. त्यांच्या शरीरातील काँग्रेसचे रक्त कमी होण्यास आणखी काही वेळ लागेल अशी मिश्कील टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. महाविकास आघाडी ही राज्यातील एक टोळीच असून ही मंडळी कोणतीही विचारधारा अथवा मुद्द्यावर एकत्र आली नसल्याचे सांगतांना त्यांनी घरोबा एकासोबत तर संसार दुसर्‍याबरोबर अशी महाविकास आघाडीची अवस्था असल्याचीही टीका केली.

यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चाबाबत केलेल्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला. रविवारचा मोर्चा सकल हिंदू समाजाने काढला होता व त्यात सगळ्याच राजकीय पक्षाची माणसं सहभागी झाली होती असे सांगताना हिंदुत्त्वाशी फारकत घेतलेल्या ठाकरे सेनेला यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. सदरचा मोर्चा कोणत्याही सरकारच्या विरोधात नव्हता तर तो लव्ह जिहाद आणि धर्मांतर याबाबत समाजात जागृती करण्यासाठी तो काढण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. राज्यात लव्ह जिहाद आणि बळजोरीच्या धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा देतांना मंत्री विखे पाटील यांनी शिवसेनेचा लव्ह जिहाद व धर्मांतराला पाठिंबा आहे का? असा सवालही खासदार राऊत यांना विचारला. भाजपावर टीका करण्यापेक्षा खासदार राऊत यांनी या विषयावरील ठाकरे सेनेची भूमिका लोकांसमोर मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

आज सकाळी 8 वाजता पाचही जिल्ह्यातील 338 मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरु झाली. सुरुवातीच्या दोन तासांत बहुतेक ठिकाणी वातावरणात प्रचंड गारवा आणि धुक्याची दाट चादर असल्याने मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मात्र सकाळी 11 नंतर मतदानाला काहीसा वेग आल्याचे चित्र दिसत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत पाच जिल्ह्यांच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील 2 लाख 62 हजार 731 मतदारांमधील 83 हजार 289 (31.71 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यात सर्वाधीक 7 हजार 972 (34.05 टक्के) मतदान धुळे जिल्ह्यात, 37 हजार 647 (32.55 टक्के) अहमदनगर जिल्ह्यात, 6 हजार दोन (31.93 टक्के) नंदूरबार जिल्ह्यात, 10 हजार 843 (30.93 टक्के) जळगाव जिल्ह्यात तर सर्वात कमी 20 हजार 641 (29.91 टक्के) मतदान नाशिक जिल्ह्यात नोंदविले गेले आहे. संगमनेर तालुक्यात एकूण 29 हजार 115 मतदारांची संख्या असून दुपारी चार वाजेपर्यंत 17 हजार 95 (58.72 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *