नाशिक पदवीधर मतदार संघात पहील्या दोन तासांत साडेनऊ टक्के मतदान! निवडणूक यंत्रणेकडून चोख व्यवस्था; सत्यजीत तांबे व शुभांगी पाटील यांच्यातच मुख्य लढत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 20 दिवसांपासून विविध नाट्यमय घडामोडींनी रंगतदार अवस्थेत पोहोचलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात संपूर्ण तालुक्यात पसरलेले दाट धुके आणि बोचरा गारवा यामुळे सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाची टक्केवारी फारशी उत्साहवर्धक नसल्याचे आले. मात्र साडेनऊ नंतर सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने मतदान केंद्रांवरील रांगा वाढू लागल्याचे दिसत आहे. पहिल्या दोन तासांत संगमनेर तालुक्यातील 28 मतदान केंद्रात 9.53 टक्के मतदान झाले असून सर्वाधीक 12.27 टक्के मतदान अध्यापक विद्यालय (बी.एड्.कॉलेज) केंद्रावर नोंदविले गेले आहे.


विविध नाट्यमय घडोमोडींची भरमार असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अखेर आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजेडला. मात्र आज भल्या पहाटेपासूनच संपूर्ण संगमनेर तालुक्यावर दाट धुक्याची झालर पसरल्याने व त्यातच वातावरणात बोचरा गारवा असल्याने सकाळच्या सत्रात जनजीवन गारठल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतदार घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याचेही पहायला मिळाले. त्याचा परिणाम सकाळी आठ ते दहा या दोन तासांतील मतदानाच्या टक्केवारीत झाला असून संगमनेर तालुक्यातील एकूण 28 मतदान केंद्रांवर सरासरी 9.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.


पाच जिल्हे आणि 56 तालुके समावीष्ट असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार असून त्यात सर्वाधीक 1 लाख 15 हजार 638 मतदार एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल नाशिक 69 हजार 652, जळगाव 35 हजार 58, धुळे 23 हजार 412 व नंदूरबार जिल्ह्यात 18 हजार 971 मतदार आहेत. प्रत्येक तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने पाचही जिल्ह्यात मिळून 338 मतदान केंद्रांची रचना केली असून त्यातही सर्वाधीक 147 मतदान केंद्र एकट्या नगर जिल्ह्यात आहेत.


संगमनेर तालुक्यात एकूण 29 हजार 115 मतदार असून ही संख्या धुळे व नंदूरबार या जिल्ह्यातील एकूण मतदारांपेक्षाही अधिक आहे. त्यात 9 हजार 780 महिला तर 19 हजार 335 पुरुष मतदारांची संख्या आहे. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे – बी.एड्.कॉलेज (अकोले रोड) एकूण मतदान 3 हजार 104, झालेले मतदान 381 (12.27 टक्के), मालपाणी विद्यालय (अकोले रोड) एकूण मतदान 3 हजार 691, झालेले मतदान 435 (11.78), पी.जी.आंबरे पाटील विद्यालय (गणेशनगर) एकूण मतदान 3 हजार 264, झालेले मतदान 302 (9.25 टक्के),


पद्मरसिक शाह विद्यालय (गणेशनगर) एकूण मतदान 726, झालेले मतदान 72 (5.92 टक्के), जिल्हा परिषद शाळा (धांदरफळ बु.) एकूण मतदान 1 हजार 558, झालेले मतदान 180 (11.55 टक्के), जिल्हा परिषद शाळा (आश्‍वी बु.) एकूण मतदान 2 हजार 251, झालेले मतदान 182 (8.09 टक्के), जिल्हा परिषद शाळा (शिबलापूर) एकूण मतदान 2 हजार 321, झालेले मतदान 184 (8.06 टक्के), न्यु इंग्लिश स्कूल (तळेगाव दिघे) एकूण मतदान 1 हजार 970, झालेले मतदान 149 (7.56 टक्के), जिल्हा परिषद शाळा (समनापूर) एकूण मतदान 2 हजार 283, झालेले मतदान 225 (9.86 टक्के), जिल्हा परिषद शाळा (घारगाव) एकूण मतदान 880, झालेले मतदान 54 (9.14 टक्के),


जिल्हा परिषद शाळा (डोळासणे) एकूण मतदान 1 हजार 478, झालेले मतदान 134 (9.07 टक्के), वीरभद्र विद्यालय (साकूर) एकूण मतदान 1 हजार 73, झालेले मतदान 105 (9.79 टक्के) व जिल्हा परिषद शाळा (पिंपरणे) एकूण मतदान 2 हजार 449, झालेले मतदान 247 (10.08 टक्के). याप्रमाणे तालुक्यातील एकूण 28 मतदान केंद्रातील 29 हजार 115 मतदारांपैकी 2 हजार 776 मतदारांनी (9.53 टक्के) पहिल्या दोन तासांत मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदार संघात सर्वाधीक मतदान अहमदनगर जिल्ह्यात..
मतदान प्रक्रिया सुरु होवून चार तासांचा कालावधी लोटला असला तरीही पदवीधर म्हणवल्या जाणार्‍या नाशिक मतदार संघात अद्यापही मतदानाला फारसा जोर नसल्याचे दिसत आहे. सकाळच्या पहिल्या दोन तासांत पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात 17 हजार 115 जणांनी (6.52 टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यातही सर्वाधीक 8 हजार 334 (7.21 टक्के) मतदान अहमदनगर जिल्ह्यात नोंदविले गेले आहे. धुळे जिल्ह्यात 1 हजार 534 (6.55 टक्के), जळगाव जिल्ह्यात 2 हजार 267 (6.47 टक्के), नंदूरबार जिल्ह्यात 1 हजार 158 (6.12 टक्के) व सर्वात कमी नाशिक जिल्ह्यात अवघे 3 हजार 822 (5.49 टक्के) मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *