‘अखेर’ विखेंचा सत्यजीत तांबेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार! न भूतो घडलेला प्रसंग; राजकीय वैर विसरुन डॉ.सुजय विखेंचा जाहीर पाठींबा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वेगवेगळे प्रसंग आणि घटनांचे वळणं घेत राजकीय विश्‍लेषकांना तोंडघशी पाडणार्‍या नाशिक पदवीधर मतदार संघात आणखी एक नाट्यमय घडामोड समोर आली आहे. अहमदनगर दक्षिणचे भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपले पारंपरिक राजकीय वैरी समजल्या जाणार्‍या ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांना पाठींबा जाहीर केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सायंकाळी शिक्षक व पदवीधर मतदार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची घोषणा करीत एकप्रकारे विधान परिषदेच्या आखाड्यातून आश्‍चर्यकारक माघार घेतली. त्या पार्श्‍वभूमीवर शनिवारीच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पक्ष देईल तो आदेश हा ठेवणीतला शब्दप्रयोग करतांना भूमिपूत्राला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत वक्तव्य केले होते. थोरात-विखे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या राज्याला ज्ञात आहे, असे असतांना डॉ.विखे यांनी सत्यजीत तांबे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार करुन आपली यंत्रणाही कामाला लावली आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडून पाठींबा मागितलेला नाही.


उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून अगदी मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत घडलेल्या विविध राजकीय घडामोडींमूळे नाशिक पदवीधर मतदार संघ संपूर्ण राज्यात चर्चेत आला. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपाकडून पाठींबा जाहीर होईल असे अंदाज बांधून ‘त्या’ क्षणाची वाटं पाहण्यात पंधरा दिवसांचा काळ गेला, मात्र तसं काही घडलंच नाही. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक सत्यजीत तांबे हे आपल्या वडिलांच्या ऋणानुबंधावरच लढतील असे जवळपास निश्‍चित झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षक व पदवीधर मतदार संघाबाबत स्थानिक पदाधिकार्‍यांना सर्वाधीकार देत एकप्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघारच घेतली.

प्रदेश कार्यकारणीकडून अशा प्रकारचा निर्णय होणार असल्याची कदाचित पूर्वकल्पना असल्याने भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शनिवारी अहमदनगरमध्ये जाहीर वक्तव्य करतांना ‘पक्ष आदेश देईल त्याला विजयी करण्यासाठी काम करु’ असे सांगतांनाच भूमीपुत्राच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे संकेतही दिले होते. शनिवारी सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घोषणेनंतर त्याचे पडसाद आज अहमदनगर जिल्ह्यात दिसून आले.


आज सकाळपासूनच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांच्या सोशल माध्यमातील स्टेट्सवर सत्यजीत तांबे यांच्या फोटोसह ‘विजयी भवंः’ असे आश्‍वासक शब्द झळकू लागले आहेत. विखे पाटलांच्या यंत्रणेचा लौकीक सर्वश्रृत आहे, त्याच जनसेवा मंडळाच्या सोशल समुहातही अशाच प्रकारे सत्यजीत तांबे यांचे फोटो झळकल्याने विखेंची यंत्रणा तांबेंसाठी कार्यरत झाल्याचे दिसू लागले आहे. डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी जिल्ह्यात जवळपास 20 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली होती. डॉ.सुजय विखे यांनी सत्यजीत तांबे यांना उघड पाठींबा जाहीर केल्याने तांबे यांच्या मताधिक्क्यात मोठी वाढ झाली आहे हे मात्र निश्‍चित.


सत्यजीत तांबे यांनी अद्याप पर्यंत भारतीय जनता पार्टीकडून पाठींबा मागितलेला नाही. त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेसच्या विचारांचा वारसा सोबत असल्याचेच वक्तव्य केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांना विविध शिक्षक संघटनांसह पदवीधर, उद्योजक, व्यावसायिकांच्या समुहांनी पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत तांबे यांचे पारडे खूप जड आहे. त्यातच भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांनी न मागताही त्यांना पाठबळ दिल्याने एकूण मतदार संघातील 44 टक्के मतांचा वाटा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मतदान प्रभावित होणार आहे.


डॉ.सुधीर तांबे यांनी गेल्या 13 वर्षाच्या आपल्या कारकीर्दीत या मतदार संघात केलेली कामे, त्यांनी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे नाते, सातत्याचा जनसंपर्क अशी वेगवेगळी बलस्थानं घेवून सत्यजीत तांबे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर अनेकांनी ते भाजपाच्या दावणीला बांधले जातील असे कयास लावले होते, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या विषयाकडे कटाक्षही टाकल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ते भाजपाकडून पाठींबा मागणार नाहीत हे जवळपास निश्‍चित होते. आता त्यांना न मागताही चक्क आपल्या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्याकडूनच रसद पुरवठ्याचा जथ्था रवाना झाल्याने सत्यजीत तांबे यांचा विजय विधान परिषदेच्या इतिहासातील ‘न भूतो न भविष्यतिः’ असाच ठरेल असा दावा तांबे यांचे समर्थक करीत आहेत.

आमच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्तास्तरावर झाला आहे. सत्यजीत तांबे तरुण आहेत, होतकरु आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळायला हवी. त्यासाठी सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील
महसूलमंत्री : महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *